पालकमंत्र्यांनी बैठकीत राखले सुरक्षित अंतर
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला कोरोना आढावा
अंबरनाथ : कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वानी सोशल डिस्टनसिंग पाळावे अर्थात सुरक्षित अंतर ठेवून रहावे असे पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच दिवस रात्र घोषा करीत आहेत. मात्र नागरिक अजूनही अनेक ठिकाणी गर्दी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अंबरनाथ पालिकेत आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी स्वतःच बैठक घेताना सुरक्षित अंतर ठेवले. ते चक्क व्यासपीठावर न बसता सदस्य अथवा नागरिक बसतात त्या बाकांवर बसले. या बैठकीत पालक मंत्री एककनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. संचार बंदीमध्ये ज्या सामाजिक संस्था गरिबांना धान्य वाटप व अन्य कामे करून शासनाला मदत करीत आहेत अशा सामाजिक संस्थांची नोंद करून त्या संस्थांना शासनमान्य धान्य दुकानातून नियमित धान्य देण्याचे निर्देशही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पालिकेला आणीबाणीच्या प्रसंगी मदत म्हणून तातडीने चाळीस लाख रुपये देण्याचे आदेशही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
अंबरनाथ परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद येथे आढावा बैठक घेण्यात आली. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील कोरोना संबंधित सर्व माहिती मुख्याधिकारी देविदास पवार आणि नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी दिली. शहरातील घ्यावयाची खबरदारी, त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा केली.
शहरातील ज्या सामाजिक संस्था या संचारबंदीच्या काळात अडकलेल्या नागरिकांना, गोरगरीब जनतेला धान्य पुरवठा करीत आहेत, अन्नदान करीत आहेत, रक्तदान शिबिरे घेऊन एक प्रकारे शासनाला सहकार्य करीत आहेत अशा संस्थांची प्रशासनाने नोंद करून अशा संस्थांना शासनमान्य दुकानातून वरचेवर धान्य पुरवठा करण्याचे निर्देश पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. पालिका चांगले कार्य करीत आहे. त्यांना आर्थिक मदत म्हणून चाळीस लाख रुपये तात्काळ देण्यात यावेत असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला मार्केट व जीवनावश्यक वस्तू या फक्त सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालू ठेवायचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी अंबरनाथ तसेच परिसरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकारी वर्गास सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला निर्देश दिले.
महात्मा गांधी विद्यालय येथे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेल्या त्याचप्रमाणे परराज्यातून आलेल्या नागरिकांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत येथील आश्रितांची आत्मियतेने चौकशी केली. यासमयी महात्मा गांधी विद्यालयातील संपूर्ण व्यवस्थापनाची त्यांनी पाहणी केली.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तहसीलदार जयराज देशमुख, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, मुख्याधिकारी देविदास पवार, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, नगरसेवक पंकज पाटील, एड. निखील वाळेकर आदी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
578 total views, 1 views today