जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने आज १० एप्रिलच्या रात्री बारा वाजेपासून मंगळवार १४ एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची सूट देण्यात आलेली होती. मात्र ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडई मध्ये नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती तसेच सुरक्षित अंतराचे नियमही पाळले जात नव्हते. त्यामुळे वारंवार संचारबंदी आदेशाचा भंग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वेळोवेळी याबाबत नागरिकांना आवाहन तसेच कायदेशीर कारवाई करूनही लोकांच्या वर्तनात फरक न पडल्याचे निदर्शनात आल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने भाजी मंडई भाजीपाला बाजार फळ बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश फक्त मनपा नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असतील. त्याचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (बी) रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दिला आहे.
562 total views, 1 views today