राज्यातील शालेय विद्यार्थीही करणार आता ‘लर्न फ्रॉम होम’

ऑनलाईन प्रणालीची पडताळणी करण्याचे वर्षा गायकवाड यांचे आदेश

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या.

या ऑनलाईन बैठकीस अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी,  शिक्षण संचालक दिनकर पाटील तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी टी.व्ही., रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा. शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे. सर्व अधिकारी यांनी लक्ष निर्धारित काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण देता येईल, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दीक्षा ॲप,  स्मार्ट फोनद्वारे पालक, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांसाठी आराखडा दिल्याचे, त्याचप्रमाणे इयत्ता निहाय पालक,शिक्षकांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना दिली.

विनाअनुदानित शाळांना टप्याटप्याने देण्यात येणाऱ्या अनुदानबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही  करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. यावेळी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘ऑनलाईन अधिकारी व्यावसायिक विकास मंचचे’ उद्घाटन प्रा. गायकवाड यांनी केले.

 533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.