एम. टी. पी. एफ. कारखान्यात व्हेंटिलेटरची निर्मिती यशस्वी

अंबरनाथ येथील कारखान्यात ‘व्हेंटिलेटर’चा कमी वेळ व खर्चात यशस्वी प्रयोग

अंबरनाथ : भारताच्या संरक्षण खात्यांतर्गत येणाऱ्या आयुध निर्माणी समूहातील अंबरनाथ येथील मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीतील तंत्रकुशल कर्मचाऱ्यांनी ‘कोरोना’ विषाणूमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्ण शुश्रुषेत वरदान ठरणाऱ्या अद्ययावत व स्वयंचलित व्हेंलिलेटरची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. अवघ्या आठ दिवसात कंपनीच्या कामगारांनी आपले अभियांत्रीकी कौशल्य पणाला लावून रुग्णाला श्वास घेण्यास सोपे ठरणारी ही अद्ययावत यंत्रणा विकसीत केली आहे. ती सुद्धा अतिशय कमी खर्चात. आयुध निर्माणी समूहातील वैद्याकीय अधिकार्यानी चाचणी घेऊन हे यंत्र रुग्णाला पुरेसा श्वास घेण्यास मदत करू शकेल, असा निर्वाळा दिला आहे. शासनाने जर मागणी केली तर एका महिन्यात दोन हजार व्हेंटिलेटर उत्पादन करून देऊ शकतो असा आत्मविश्वास फॅक्ट्रीचे महाव्यवस्थापक राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.

१९५३ पासून अंबरनाथ येथील मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीमध्ये लष्कर आणि नौदलासाठी आवश्यक ती अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती होत आहे. देशाच्या सर्व आणीबाणीच्या प्रसंगी हा कारखाना सदैव तत्पर सेवा देत असतो. ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या संसर्गाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतही त्याला अपवाद नाही. युद्धजन्य परिस्थितीत नेहमीच उत्तम कामगिरी करणाऱ्या आयुध निर्माणी समूहाने या साथीच्या आजारातही देशवासियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आयुध निर्माणी समूहातील देशभरातील विविध कारखान्यांमध्ये सॅनिटायझर, मास्क, स्टेचर्स बनवले जात आहेत. अंबरनाथ येथील कारखान्यात अद्ययावत व स्वयंचलित व्हेंटिलेटर निर्मिती करण्यात आल्याची माहिती मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीचे महाप्रबंधक राजीवकुमार यांनी दिली आहे. शासनाने जर मागणी केली तर एका महिन्यात दोन हजार व्हेंटिलेटर उत्पादन करून देऊ शकतो असा आत्मविश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.
संचार बंदी असल्याने कामगारांना सुट्टी आहे. असे असतानाही घरी बसलेला कामगार देशावर आलेले हे कोरोना या महामारीचे संकट पाहून बेचैन झाला आहे. आम्हाला या आणीबाणीच्या प्रसंगी देशासाठी काही तरी ठोस करायचे आहे असे म्हणत आहेत. त्यातील निवडक कामगारांना बोलावून आम्ही हा व्हेंटिलेटर बनवला आहे. यातून कामगारांची जिद्द, सचोटी व देशप्रेम दिसून येत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

व्हेंटिलेटरची वैशिष्टे

मोटार आणि काही पॅरामेडिकल सुटे भाग वगळता हा संपूर्ण अद्ययावत व स्वयंचलित व्हेंटिलेटर कारखान्यात उपलब्ध असणाऱ्या साधनांतून बनविण्यात आला आहे. रुग्णाच्या गरजेनुसार दर मिनिटाला १२ ते ३० वेळा श्वाास घेता येऊ शकणारी व्यवस्था या व्हेंटिलेटर मध्ये आहे. थेट वीज आणि बॅटरी अशा दोन्ही पद्धतीने हे व्हेंटिलेटर काम करते. तीन तासांचा बॅटरी बॅकअप असल्याने रुग्णवाहिकेत रुग्णाला त्याचा उपयोग होऊ शकतो. ‘कोरोना’संसर्ग झालेल्या रुग्णाला मुख्यत: श्वास घ्यायला त्रास होतो. हे छोटे स्वयंचलित व्हेंटिलेटर अशावेळी रुग्णाला पुरेसा श्वास घेण्यास उपयोगी ठरू शकणार आहे. हा पहिला अद्ययावत आणि स्वयंचलित व्हेंटिलेटर बनविण्यासाठी अवघे पंचवीस हजार रुपये खर्च आल्याचेही राजीव कुमार यांनी सांगितले.
कारखान्याचे महाव्यवस्थापक राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संजय श्रीवास्तव ( ए. जी. एम.), पी. के. बुम्मरकर ( ए. जी. एम.), एच. के. पाटील (डायरेक्टर),

पवन गंदगे (ए. डब्ल्यू. एम.), सौरभ चीतलंगे (ए. डब्ल्यू. एम.), एस. एस. गायकवाड ( जे. डब्ल्यू. एम.), दीपक जाधव ( जे. डब्ल्यू. एम.), जयशंकर (जे. डब्ल्यू. एम.), एस. मल्लिक ( सी. एम.), के. शशिधरन (सी. एम.), जे. दत्ता. (एम. सी. एम.), ओ. पी. शर्मा (एम. सी. एम.), सुनील खेमानी (एम. सी. एम.), वी. बुथर (एम. सी. एम.), यतिन घोसाळकर (एम. सी. एम.), बाविसकर (एच. एस.-१), रणजीत ( एच. एस.१), किरण सावले (एच. एस.-१), निखिल परदेसी (एच. एस.) आदींनी हि यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.

 510 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.