…अन्यथा पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याचा तज्ज्ञांकडून इशारा

वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास मोठा धोका


नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण बाजारात मास्कच्या कमतरतेबद्दल बोलताना दिसत आहे. लाखोंच्या संख्येने मास्क उत्पादित केले जात असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. मात्र, वापरल्यानंतर मास्कचा हा अतिरेकी साठा किंबहुना कचरा हाताळायचा कसा याबद्दल कोणीच काहीही बोलत नाहीये. तज्ज्ञांच्या मते कोरोनासोबत लढताना मास्कच्या कमतरतेच्या समस्येपेक्षा जास्त मोठी समस्या वापरल्यानंतर लाखो विषाणू आणि जिवाणूयुक्त झालेल्या त्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आहे.
देशात आज कुठल्याही ठिकाणी गेल्यावर तुम्हाला लोक मास्क लावलेले दिसणार. ऐरवी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसच्या चेहऱ्यावर दिसणारे मास्क आज प्रत्येक सामान्य चेहऱ्यावर दिसतायेत. मात्र, कोटींच्या संख्येने वापरल्या जाणाऱ्या या मास्कची विल्हेवाट कशी लावायची याकडे कोणीही लक्ष देत नाही. सर्वात प्रथम तर मास्कची गरज प्रत्येकाला नाहीच असे तज्ज्ञ डॉक्टर्सचे म्हणणे आहे. रुग्णालयात जे रुग्णांना हाताळतात, त्या डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफला या मास्कची जास्त गरज असते. मात्र, सध्या कोरोनाच्या अनामिक भीतीमुळे सर्वसामान्यांना मास्क सर्वांसाठी आवश्यक झाल्यासारखा वाटत आहे.

सोप्या शब्दात सांगायचे तर मास्क हा रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्ट या प्रकारात मोडणारा कचरा आहे. रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावायची एक पद्धत आहे. त्याचे काही नियम आहेत. मात्र, सध्या मास्क सर्वसामान्य माणसांकडून वापरला जात असल्याने थोड्या प्रमाणात का होईना घराघरातून तो घटक बायो मेडिकल वेस्ट निघू लागला आहे. त्यामुळे स्वतःची सुरक्षा म्हणून जे लोकं मास्क वापरतायेत. इतरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी, अशी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तज्ज्ञांच्या मते वापरलेले मास्क थेट घरातल्या डस्टबिन मध्ये टाकून मोकळे होता येणार नाही. वापरलेल्या मास्कची योग्यपद्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी चार सुरक्षित पद्धती आहेत.

प्रत्येक मास्कचा ठराविकच असतो कालावधी

बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्राच्या अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या मते सर्जिकल, ट्रिपल लेयर किंवा एन ९५ सारखे उच्च श्रेणीचे मास्क असो. प्रत्येकाची एक काळमर्यादा ठरलेली असते. त्यानंतर तो सुरक्षित राहत नाही. त्यामुळे त्या काळमर्यादेनंतर नवा मास्क वापरणे गरजेचेच ठरते. वापरल्यानंतर वापरणाऱ्यांच्या थुंकीतून लाखो विषाणू किंवा जिवाणू त्या मास्कच्या आतील बाजूस राहू शकतात. इतर घरघुती कचऱ्यासारखं वापरलेले मास्क घरघुती कचऱ्यात टाकले. तर त्यामुळे घरापासून डम्पिंग यार्डपर्यंत तो कचरा हाताळणारे अनेक लोकं संक्रमित होण्याचा धोका वाढतो. सध्या कोट्यवधी लोकं मास्क वापरत असल्यामुळे सामाजिक आरोग्यासाठी हा धोका खूप मोठा झालाय. शिवाय मास्क पॉलीप्रोपेलिन या पदार्थापासून बनलेले असतात. या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे उघड्यावर फेकल्यानंतर तो पॉलिथिन सारखाच लवकर नष्ट न होता वर्षानुवर्षे टिकतो. त्यामुळे मास्कची योग्य विल्हेवाट न लावल्यास आपण पर्यावरणीय प्रश्नही निर्माण करणार आहोत.

मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची पद्धत

१) वापरलेल्या मास्कला पाण्यात ५ % ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात ५ ते १० मिनिट निर्जंतुक करा मग कागदात गुंडाळून डस्टबिन मध्ये टाका.
२) १ % सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रव वापरून त्यात मास्क निर्जंतुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिन मध्ये टाका.
३) जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत गाडून द्यावे.
४) सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षितरित्या जाळावे.

 566 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.