मोदींच्या आवाहनाला चंद्रकांत पाटलांकडून हरताळ

मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करा – पाटील यांंचे आवाहन

मुंबई : कोरोना विरोधात लढा देताना आपली एकजूट दाखविण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, पणती, मोबाईलचा फ्लॅश लाईट, टॉर्च लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जनता कर्फ्युच्यावेळी अनेकांनी रस्त्यावर येत गर्दी केली होती. यामुळे आता तरी रस्त्यावर येऊ नका, असेही आवाहन यावेळी मोदींनी केले. मात्र, भाजपाच्याच प्रदेशाध्यक्षांनी मोदींच्या अवाहनाला हरताळ फासत मोदींच्या भूमिकेच्या अगदी उलटी भूमिका घेतलेली दिसतेय. त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात, ‘९ एप्रिलला सर्वांनी मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करा’, असे थेट आवाहन केले आहे.

एकीकडे गर्दी टाळण्यासाठी प्रशासन आणि सरकार झटत असताना पाटील मात्र लोकांना मोकळ्या जागेत जमायला सांगून जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करण्याचेच अवाहन करत असल्याची चर्चा आहे.

२२ मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी खिडकीत अथवा बाल्कनित उभे राहून थाळी, घंटी, ताट, टाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, उत्साही लोकांनी गर्दी करत थाळ्या आणि टाळ्यासोबतच रस्त्यांवर फिरुन ढोल वाजवले होते. एवढेच नाही तर अनेकांनी रॅली देखील काढली होती. त्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती.
याचा काहीसा विसर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडलेला दिसतोय. म्हणूनच की काय मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करण्यासाठी एकजूटीने या, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचनाही ते करायला विसरले नाहीत.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.