आदिवासी पाड्यांत पाणी टंचाई
बदलापूर ता. ३ (बातमीदार) :
बदलापूर:करोनाशी लढाई देत असताना आता आदिवासी पाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बदलापुर गावाच्या वेशीवर असलेल्या ठाकूरवाडी या गावात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. परिणामी या ठाकूरवाडीमधील आदिवासी बांधवांना बदलापूर गावातील सार्वजनिक शौचालय किंवा गावातील गावकऱ्यांच्या घरातून पाणी भरण्याची वेळ आली आहे.
बदलापुर गावाच्या वेशीवर ठाकूरवाडी ही आदिवासी वस्ती आहे. येथे जवळपास तीनशे आदिवासी बांधव वास्तव्य करतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचार बंदी असल्याने सर्वच आदिवासी बांधव घरात बसून आहेत. घरात असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. या आदिवासी पाड्यात अद्याप घरोघरी जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या एका सार्वजनिक नळातून हे आदिवासी बांधव पाणी भरत असतात. या सार्वजनिक नळालाही गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सॅनिटायझरचे वाटप करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस कालीदास देशमुख या ठिकाणी गेले होते. त्यावेळी आदिवासी बांधवांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. स्वच्छता राखण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पुरेसे पाणी नसल्याने स्वच्छता राखायची कशी, असा सवाल या आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता होत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना ठाकूरवाडीचा पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली असल्याची माहिती कालिदास देशमुख यांनी दिली आहे. तर येथील आदिवासी बांधवांसाठी पाणी सोडण्याचा कालावधी वाढवला जाईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
596 total views, 2 views today