सोशल डिस्टनसिंगचे भान पाळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी रविवारी (पाच एप्रिल) रात्री नऊ वाजता प्रत्येक भारतीयाने सर्व लाईट बंद करून घराच्या गॅलरीत किंवा दारात येऊन नऊ मिनिटांसाठी एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी असा कोणताही प्रकाश प्रज्वलित करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे करताना सोशल डिस्टन्सिंगचे भान प्रत्येकाने पाळावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नऊ वाजता देशवासीयांशी एका व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत, लॉकडाऊनमध्ये देशवासीयांनी चांगले धैर्य व एकजुटीचे दर्शन घडविले आहे, त्याबद्दल मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. कोरोनाला हरविण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. मोदींनी भारतीयांकडे पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता एक गोष्ट करण्याचे आवाहन केले. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदी म्हणाले.
करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब लोकांना बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत, असे मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असे आवाहन मोदी यांनी केले.
करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोणीही एकटं नाहीय, असा विश्वास मोदी यांनी देशातील जनतेला दिला. आपण एकटे कसे या संकटाला तोंड देऊ, असा प्रश्न तुम्हाला घरात बसून पडला असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाही आहात. भारतातील १३० कोटी जनता एकत्र या संकटाचा सामना करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात ठेवा, असेही मोदी म्हणाले.
करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, असे भावनिक आवाहन मोदी यांनी देशातील जनतेला केले. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात, असे मोदी शेवटी म्हणाले.
669 total views, 2 views today