कोरोनाविरोधात विरोधी पक्ष सरकारला साथ देणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सरकारसोबत उभे राहण्याचा निर्धार

मुंबई : देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून या संकटाविरुद्ध राज्य सरकारने लढा पुकारला असताना, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सगळेच वज्रमूठ करून उभे ठाकले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या लढाईत सरकारसोबत उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि करोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपाराज्य सरकारसोबत आहे, अशी ग्वाही त्यांना दिली. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत. राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केले.

रेशन वितरणाबाबत राज्य सरकारच्या दोन वेगवेगळ्या आदेशांवर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन आदेशांमुळे वितरकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. या अनुशंगाने रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याबाबतही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले.

दरम्यान, करोनासारख्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे. त्यातूनच फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून करोनाच्या लढाईत सरकारसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनीही विरोधी पक्षाच्या या भूमिकेचे स्वागत केले.

 441 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.