माजी विद्यार्थी संघाचा उपक्रम
अंबरनाथ : येथील दि एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे नाका कामगारांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. दहा दिवस पुरेल इतके धान्यच वाटप शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
सध्या देशभरात कोरोना रोगाच्या थैमानामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. संचारबंदी मुळे अनेकांचा रोजगार बंद झाला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक नाका कामगारांना रोजच्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समाज बांधवांसाठी काही करावे, अशी संकल्पना डॉ. विवेकानंद वडके यांनी माजी विद्यार्थी संघाच्या व्हाट्सएप समूहावर मांडली. वडके यांच्या सूचनेला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील भालेराव यांनी अनुमोदन देत आपल्या ग्रुपवर तसे आवाहन केले आणि त्याला सदस्यांकडून लगेच चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासात जवळपास साठ हजार रुपये निधी संकलन झाले.
यामधून सुमारे ७५ कुटुंबाना काही दिवस पुरु शकेल इतके तांदूळ, गहू पीठ, डाळ, तेल, मीठ, साबण अशा जीवनावश्यक वस्तू विकत घेऊन त्यांचे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ येथे वाटप करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरक्षित अंतर ठेवून हे वाटपा करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे डॉ. अजित गोडबोले, अशोक कुळकर्णी, विनायक पटवर्धन, शैलेश रायकर, संतोष रावते, प्रशांत बुटेरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
644 total views, 1 views today