सरकारी मदत न मिळाल्यास रिक्षावाल्या काकांवर आत्महत्येची वेळ

नारायण पवार यांनी वेधले उद्धव ठाकरेंचे लक्ष

ठाणे : हातावर पोट असलेल्या मुंबई-ठाण्यातील हजारो रिक्षाचालकांना सरकारची मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांप्रमाणेच रिक्षावाल्या काकांवर आत्महत्येची वेळ येईल, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री. पवार यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री सहायता निधीतून रिक्षावाल्या काकांना दिलासा देण्यासाठी साकडे घातले आहे. दरम्यान, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली असून, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन)आशिष कुमार सिंह यांना कार्यवाही करण्याची सुचना दिली आहे.
हजारो रिक्षाचालकांची दहा ते बारा दिवसांपासून रोजीरोटी बंद झाली. त्याआधी आठ दिवसांपासून गर्दीवरील निर्बंधामुळे व्यवसायात घट झाली होती. प्रत्येक रिक्षावाल्या काकांचे जीणे हे रोज कमवील, तर रोज खाईल, असे आहे. यापुढील काळातही कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती कशी राहील, याचा अंदाज नाही. त्यामुळे त्यांची मानसिक व आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. प्रत्येक रिक्षाचालकाच्या कुटुंबात चार ते पाच सदस्य आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जीवन-मरणाची वेळ आली आहे. एकीकडे कोरोना, तर दुसरीकडे जगण्याची लढाई अशा कात्रीत रिक्षावाले काका अडकले आहेत. या रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
दररोजचा दैनंदिन खर्च भागवितानाही रिक्षाचालकांना नाकीनऊ येत आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबात आजारपण उद्भवल्यास रिक्षाचालकांनी कोणाकडे मदत मागायची, असा सवाल नारायण पवार यांनी केला. आतापर्यंत सरकारकडून विविध समाजघटकांना मदतीचा हात दिला गेला. मात्र, त्यात रिक्षावाल्या काकांचा समावेश नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून रिक्षाचालकांना मदत द्यावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली.
या मागणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंह यांना कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.

 693 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.