अंध बांधवांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत सरसावली

अंध, अपंगांसाठी वांगणी ग्रामपंचायतीकडून अन्नवाटप

बदलापूर : कोरोना संसर्ग वाचवण्यासाठी मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असल्याने शेकडो अंध, अपंगांच्या दररोजच्या रोजगारावर गदा आली आहे. पैसे नसल्याने अशा अंध अपंगांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वांगणी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अशा अंधांसाठी दररोज दोन वेळचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

मुंबईच्या उपनगरी आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये, रेल्वे स्थानकांवर, पादचारी पुलांवर कडेला बसून अंध बांधव वस्तूंची विक्री करतात. यातील बहुतांश अंध बांधव वांगणी परिसरात रहात आहेत. अपंग बांधवांची संख्याही जवळपास तितकीच आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने मुंबईची लोकलसेवा बंद करण्यात आली. रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने या सर्व अंध आणि अपंग बांधवांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे या अंध बांधवांना घरीच बसावे लागते आहे. रोजगार बंद पडल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याने वांगणीतील हे बांधव चिंतेत पडले होते. त्यांनी मदतीसाठी अंबरनाथचे तहसिलदार जयराज देशमुख यांच्याकडे मदतीसाठी याचना केली होती. तहसीलदार जयराज देशमुख यांनी तातडीने वांगणी ग्रामपंचायतीला अंध बांधवांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

वांगणी ग्रामपंचायतीनेही कोणताही विलंब न लावता गुढी पाडव्यापासून अंध आणि अपंग बांधवांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी वांगणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून या जेवणाचे वाटप करण्यात आले. मात्र गर्दी होत असल्याने अंध बांधवांना त्यांच्या घरीच ही सुविधा दिली जात असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेलार यांनी दिली आहे. वांगणीतील अंध आणि अपंग बांधवांसाठी करोना प्रतिबंध केंद्राची उभारणीही करण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. वांगणी ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे वांगणतील अंध आणि अपंग बांधवांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे. जोपर्यंत संचारबंदी उठत नाही तोपर्यंत ही सुविधा दिली जाणार असल्याचे वांगणी ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले आहे.

 517 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.