मंत्रालय, विधानभवन, मंत्र्यांच्या बंगल्यांचे निर्जंतुकीकरण होणार

कोरोना विरुद्धच्या लढाईत निधी कमी पडू दिला जाणार नाही

मुंबई : शहरांमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत मंत्रालय, विधानभवन, मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास, सर्व शासकीय कार्यालय, एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

सध्या राज्यात करोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आताच जनतेला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबई, पुणे या भागात करोना रूग्णांची संख्या अधिक आहे, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी देत असलेल्या निर्देशाचे पालन करून राज्यातील जनतेने सहकार्य करावे असेही ते म्हणाले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, राज्यातील सर्व विभागाच्या मंत्र्यांचे बंगले, एसटी महामंडळाच्या बसेस, शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज आपत्ती व्यवस्थापनासाठी ४५ कोटीचा निधी दिला असला तरी, भविष्यात निधी कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे आवाहनही यावेळी केले.

करोना विषाणूचा संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती आहे. तेव्हा या राष्ट्रीय आपत्तीत जनतेने सहकार्य करावे, राज्य शासनाच्यावतीने घेतले जाणारे सर्व निर्णय हे जनतेला वाचविण्यासाठी आहे, कुणीही सक्ती किंवा बळजबरीने लादलेला निर्णय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. मोठ्या शहरात विषाणू पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालय तथा खासगी दवाखान्यांचे देखील निर्जंतुकीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

 544 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.