राज्य सरकार चांगलं काम करत आहे- राज ठाकरे
मुंबई : राज्यात युद्धासारखी परिस्थिती आहे पण या परिस्थितीत मुख्यमंत्री आणि त्यांचं शासन अतिशय चांगंल काम करत आहेत. सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आणि राज्य शासन परिस्थिती अतिशय व्यवस्थित हाताळत आहेत. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
जनता कर्फ्यू म्हणजे एक केस टेस्ट होती. परंतू एक दिवस बंद ठेऊन काम भागणार नाही. दुसऱ्या दिवशी घराबाहेर येऊन फिरण्यासाठी म्हणून जनता कर्फ्यू लावला होता काय? असा सवाल करत मूठभर लोकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही, अशा शब्दात त्यांनी हिंडफिऱ्या लोकांवर नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझं फोनवरून बोलणं झालं आहे. हातावरचं पोट असणाऱ्यांना सरकारनं मदत करावी. देशांतर्गत विमानसेवा सरकारनं बंद करावी तसंच कंपन्यांनी कामगारांचा पगार कापू नये या आणि अशा अनेक विषयांवर माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी ७४ कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात होते. आज म्हणजे सोमवारी हा आखडा थेट ८९ वर पोहचला आहे. यावरून कोरोनाचं संकट किती मोठं आहे याची कल्पना येत आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे.
718 total views, 1 views today