मुंबईकर पाहुण्यांना घरी बोलवाल, तर गुन्हे दाखल करू

सावंतवाडी तहसीलदारांच्या सूचना

रिक्षा पुर्णतः बंद, हॉटेल सुरु मात्र पार्सलची सक्ती

सावंतवाडी :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही लोक सुट्टी असल्यामुळे मुंबईतील नातेवाईकांना आपल्या घरी बोलवत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील,तसेच नातेवाईकांना घरात ठेवणाऱ्या संबंधित कुटुंबाला कोरोनटाईन मध्ये ठेवण्यात येईल,असा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे.दरम्यान तालुक्यातील सर्व रिक्षा बंद करण्यात याव्यात,हॉटेल सुरू ठेवण्यास हरकत नाही,मात्र त्याठिकाणी पार्सलची सोय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे,असेही म्हात्रे यांनी सांगितले.
याबाबत म्हात्रे म्हणाले, सुट्टी पडल्यामुळे मुंबईतील आपल्या नातेवाईकांना आपल्या घरी या असे आग्रह काही लोकांकडून केला जात असल्याची माहिती अनेकांनी दिली आहे.हा सर्व प्रकार चुकीचा आहे.आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सगळ्यांनी वेगळे राहणे गरजेचे आहे.मात्र मुंबईतील चाकरमान्यांना घरी बोलावून आजाराचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशा लोकांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील,असा इशारा त्यांनी दिला आहे.तसेच ज्या लोकांकडे मुंबईतील चाकरमानी येतील अशा लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल,असेही म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे.

 586 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.