जिल्ह्यात ६ हजार ४८६ गरोदर व स्तनदा माता तसेच ३६ हजार २३ बालकांना भारतरत्न डॉ. ए.पी जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांनी घेतला योजनेचा आढावा

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात भारतरत्न डॉ. ए.पी जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेतर्गत ६ हजार ४८६ गरोदर व स्तनदा माता तसेच ७ महिने ते ६ वर्षाखालील ३६ हजार २३ बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आज ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी या योजनेचा तिमाही आढावा घेतला. यावेळी आरोग्य समिती सभापती वैशाली चंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) संतोष भोसले आदि उपस्थित होते.

जिल्ह्याच्या आदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे ही योजना राबवली जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु करण्यात आली.

या योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातेस एकवेळचा चौरस आहार देण्यात येतो. एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती/ भाकरी, भात, कडधान्य-डाळ, सोयादूध साखरेसह, शेंगदाणा लाडू, अंडी/ केळी/ नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला याचा समावेश आहे. तसेच अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अंडी/ केळी/ स्थानिक फळे असा अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा-2 सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये स्तनदा मातेचे आरोग्य तसेच नवजात बालकाचे वजन व उंची योग्य राहून कुपोषणास प्रतिबंध होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या ८९६ अंगणवाड्या अंतर्गत ही योजना राबविली जात आहे. या बैठकीस सर्व क्षेत्रीय अधिकारी, विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 622 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.