महेंद्र चव्हाण ठरला नवा महाराष्ट्र श्री

१६ व्या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा

अमला ब्रम्हचारीने सुवर्ण राखले तर दिपाली ओगलेने मिळवले

सातारा : महेंद्र – गेल्याच आशिया श्री स्पर्धेत त्याने सुवर्ण जिंकले होते. जागतिक स्पर्धेतही सुवर्ण पदकाचे त्याने चुंबन घेतले होते. एवढेच नव्हे तर त्याने “महाराष्ट्र श्री” स्पर्धेतही चार वेळा सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता, पण महाराष्ट्र श्री स्पर्धेत “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स”चे बहुमान त्याला वारंवार हुलकावणी देत होते. मात्र गेल्या दीड दशकापासून पुण्याच्या महेंद्र चव्हाणने घेतलेल्या परिश्रमाचे अखेर आज चीज झाले. त्याने मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान मोडीत काढीत १६ व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईने आपला दबदबा कायम राखताना सांघिक विजेतेपद आणि उपविजेतेपदही पटकावले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही मुंबईच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले. मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव गटात सलग दुसऱ्यांदा “मिस महाराष्ट्र”चा मानचा पटकावला तर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात उपनगरची दिपाली ओगले “मिस महाराष्ट्र” ठरली.

शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष क्रीडाप्रेमी रवींद्र पवार यांनी “महाराष्ट्र श्री”च्या माध्यमातून सातारकरांना शरीरसौष्ठवाची पीळदार मेजवानी दिली. महाराष्ट्र श्रीचा अंतिम थरार “याची देही याची डोळा” पाहण्यासाठी तालीम संघ मैदान खचाखच भरले होते. तब्बल दहा हजार क्रीडाप्रेमींच्या साक्षीने पुण्याच्या महेंद्र चव्हाणने महाराष्ट्र श्रीचे द्वंद्व जिंकले. विविध गटातून आलेल्या दहा गटविजेत्यांमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी सात सर्वसामान्य पोझेस झाल्या. त्या होताच जजेसनी कंपेरिझनसाठी पुणेकर महेंद्र चव्हाण आणि मुंबईकर अनिल बिलावा यांना बोलावले. दोघांच्या पोझेस सुरू असताना शेकडो क्रीडाप्रेमींचा आवाज महेंद्रच्या बाजूने घुमत होता तर त्याच्या तोडीस तोड उत्तर मुंबईकर चाहते अनिल बिलावाच्या बाजूने देत होते. एकीकडून महेंद्र तर दुसरीकडून बिलावासाठी प्रेक्षक आवाज देत होते, तेव्हाच जजेसनी आपला अत्यंत अवघड कौल महेंद्र चव्हाणच्या बाजूने दिला. जजेसचा निर्णय अंतिम असला तरी बिलावाच्या मुंबईकर चाहत्यांनी त्या निर्णयाबाबत नापसंती दर्शवली. या थरारक स्पर्धेचा पुरस्कार सोहळा भारत विकास ग्रूपचे (बीवीजी) सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड, जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांतराव आपटे, सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे, उपाध्यक्ष राजेश सावंत, कोषाध्यक्ष शरद मारणे, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, आयोजक क्रीडाप्रेमी रवींद्र पवार, स्थानिक नगरसेविका सिद्धी पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

कांबळे- गुप्तामध्ये काँटे की टक्कर

राज्यातून प्रत्येक गटात एकापेक्षा एक खेळाडू उतरल्यामुळे अव्वल खेळाडूची निवड करताना पंचांची चांगली पंचाईत झाली. प्रत्येक गटाचा निकाल इतका अटीतटीचा होता की निकाल जाहीर होताच एकावर न्याय तर दुसऱयावर अन्याय अशी भावना मनात आल्यावाचून राहात नव्हती. मुंबई उपनगरच्या नितेश कोळेकर आणि नितीन शिगवण यांच्यावर कुरघोडी करत पुण्याच्या अवधुत निगडेने ५५ किलो वजनी गटात बाजी मारली. तेव्हाही मनात हेच भाव उमटले.  ६० किलो गटात उपनगरचेच देवचंद गावडे आणि प्रितेश गमरे पश्चिम ठाण्याच्या नितीन म्हात्रेचे वर्चस्व मोडून काढण्यात अपयशी ठरले. ६५ किलो वजनी गटात ठाणेकर दिनेश कांबळे आणि मुंबईकर उमेश गुप्ता यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघेही एकास एक होते. पण शेवटी दिनेशचा अनुभव अव्वल ठरला. पुढच्या गटात पुण्याच्या तौसिफ मोमीनने पालघरच्या रोशन नाईकला पछाडले तर ७५  किलोच्या गटात ठाण्याचा सुदर्शन खेडेकर नवी मुंबईच्या सतीश यादवपेक्षा किंचीत सरस ठरला.

८० किलो वजनी गटात मुंबईच्या अनिल बिलावाचे गटविजेतेपद निश्चित होते. त्याच्या तोडीचा एकही खेळाडू या गटात नव्हता. उपनगरचाच भास्कर कांबळे दुसरा आला तर पुण्याच्या राजू भडाळेला तिसरा क्रमांक मिळाला. ८५ किलो वजनी गटात मुंबईच्या सुशील मुरकरसमोरही कुणाचा निभाव लागला नाही.  “मुंबई श्री” विजेत्या रसल दिब्रिटोने ९० किलोमध्ये सहज बाजी मारली तर १०० किलो वजनी गटात अपेक्षेप्रमाणे महेंद्र चव्हाण अव्वल आला. हेवीवेट गटात निलेश दगडेने अक्षय मोगरकरला मागे टाकत गटविजेतेपद पटकावले.

मुंबई आणि उपनगरचेच वर्चस्व

यंदाही महाराष्ट्र श्रीवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट होते. १२ गटांपैकी सहा गटात मुंबईकर खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. तीन सुवर्णांसह सहा रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावणारा मुंबई उपनगरचा संघ ३०० गुणांसह सांघिक विजेता ठरला तर तीन सुवर्ण आणि तीन रौप्य जिंकणारा मुंबईचा संघ सांघिक उपविजेता ठरला. तसेच ठाण्याने तीन तर पश्चिम ठाण्याने एक सुवर्ण जिंकून चमकदार कामगिरी केली. पुण्याला दोन तर कोल्हापूरला एका गटात विजेतेपद संपादता आले. पुण्याचा तौसिफ मोमीन सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू ठरला. येत्या १९ ते २२ मार्चला इंदूर येथे होणाऱ्या भारत श्री स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या राज्याच्या संघात मुंबईसह ठाणे, पुणे आणि कोल्हापूरची ताकद दिसून येईल.

अमला आणि दिपाली मिस महाराष्ट्र

महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रम्हचारीचाच दबदबा दिसला. तिने शरीरसौष्ठव गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना मिस महाराष्ट्रचे जेतेपद कायम राखले. गतवर्षीही अमलाने हा किताब जिंकला होता. या गटात उपस्थित एकही खेळाडू तिला आव्हान देऊ शकली नाही. तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबई उपनगरच्या दिपाली ओगलेने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या मुंबई श्री स्पर्धेच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते तर या स्पर्धेत तिने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर मिस महाराष्ट्रचा निकाल बदलण्याची करामात करून दाखवली. मुंबई श्री स्पर्धेतील विजेत्या रेणूका मुदलियारवर मात करीत दिपालीने आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले. गेल्यावर्षी ती या स्पर्धेत उपविजेती ठरली होती. पुण्याची अदिती बंब तिसरी आली. या दोन्ही गटात सहभागी झालेल्dया सर्व महिला खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

माझे सुवर्णपदक आईला अर्पण – दिपाली ओगले

मी जे काही आहे ती माझ्या आईमुळेच. तिने मला माझे बोट पकडून मला चालायला शिकवले, धावायला शिकवले. या क्षेत्रात येण्याचे धाडसही तिनेच मला दिले. ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिल्यामुळेच मी मिस महाराष्ट्रचा बहुमान मिळवू शकले आहे. मला सुवर्ण जिंकताना माझ्या आईला पाहायचे होते. मी तीनदा दुसरी आली, पण माझ्या आईने मला कधीही खचू दिले नाही. गेल्यावर्षी भारत श्रीनंतर माझ्या आईचे अकस्मात निधन झाले. हा माझ्यासाठी खूप मोठा मानसिक धक्का होता. मी अक्षरश: खचले. पण मला माझ्या आईने दिलेल्या प्रेरणेच पुन्हा उभं राहण्याचे बळ दिले. मला सुवर्ण जिंकताना पाहायची माझ्या आईची इच्छा होती, ती आज असायला हवी होती. ती शरीराने नसली तरी आजही तिच्या आठवणी माझ्यासोबत आहे. तिच्या आशीर्वादामुळेच मला हे यश प्राप्त झालं आहे. त्यामुळे माझं हे पहिलं सुवर्णपदक मी माझ्या आईला अर्पण करतेय.

 595 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.