२ जखमी, १२ पैकी तिघा हल्लेखोरांना अटक
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीत जमीन वादाचा शनिवारी रात्री रक्तरंजित भडका उडाला. गेल्या अनेक वर्षांपासून दोन कुटुंबात सुरू असलेल्या या वादानंतर रात्री म्हात्रे कुटुंबातील १२ जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात भोईर कुटुंबातील २ भाऊ जबर जखमी झाले. पोलिसांनी आतापर्यंत १२ पैकी तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पश्चिम डोंबिवलीच्या सत्यवान चौक परिसरात भोईर आणि म्हात्रे कुटुंबीय राहते. या दोन्ही कुटुंबियांमध्ये गेल्या ४० वर्षांपासून जमीनीवरील दाव्यावरून वाद सुरू आहेत. यापूर्वी अनेकदा लहान-मोठ्या वादाच्या घटना घडल्या. मात्र हा वाद शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उफाळून आला. सत्यवान चौकात राहणाऱ्या भोईर कुटुंबातील हेमंत हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. देवीचा पाड्यातील गावदेवी मंदिराजवळ त्याला आदित्य पाटील, राम्या भोईर, किशोर म्हात्रे, अक्षय पाटील, अनिल म्हात्रे व त्यांच्या ८ साथीदारांनी गाठले. सोबत आणलेल्या तलवारी आणि दांडक्यांनी हेमंत भोईर याच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे पाहून मिलिंद भोईर हा भावाला वाचवण्यासाठी मधे पडला असता हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात हेमंत आणि मिलिंद असे दोघेही जबर जखमी झालेले पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील हेमंत आणि मिलिंद यांना पूर्वेकडील शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. याच दरम्यान विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आत्तापर्यंत १२ पैकी राम्या भोईर, किशोर म्हात्रे आणि अनिल म्हात्रे अशा तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे. कल्याण कोर्टाने या तिघा आरोपींना ६ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित ९ हल्लेखोरांना हुडकून काढण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत.
645 total views, 1 views today