वीस बालवाड्यांचे रूपातर मिनी अंगणवाडीत तर वीस नव्या अंगणवाड्याना मंजुरी

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सेविकांना सुखद भेट

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे नव्या मिनी अंगणवाड्या सुरु होणे गरजेचे होते. ठाणे जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या संदर्भात राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शासनाने जिल्ह्यातील २० बालवाड्यांचे रूपांतर मिनी अंगणवाडीत करत नव्याने २० अंगणवाड्या सुरु करण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल ४० नव्या मिनी अंगणवाड्यांची मंजुरी मिळाली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवेची प्रभावी अंमलबाजवणी होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यात नव्याने अंगणवाड्याना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे शासनाला कळवले होते. सध्यस्थितीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठ एकात्मिक बाल विकास प्रकल्प सुरु आहेत. तर एक पालिका क्षेत्रात आहे. अशा नऊ एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्गत १ हजार ८५४ अंगणवाड्या जिल्ह्यात सुरु आहेत. आता नव्याने भर पडलेल्या ४० मिनी अंगणवाड्यामुळे जिल्ह्यात १ हजार ८९४ अंगणवाड्या झाल्या आहेत.अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संतोष भोसले यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या वीस बालवाड्यांचे रूपांतर मिनी अंगणवाडीत झाल्यामुळे या बालवाडीत कार्यरत असणाऱ्या सेविकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पात्र असणाऱ्या बालवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका या पदावर पात्रतेनुसार नियुक्ती मिळू शकणार आहे. या अगोदर तुडपुज्या मानधनावर सेविकांना काम करावे लागत होते मात्र आता अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या सर्व सेवा मिनी अंगणवाडीतील सेविकांना मिळतील. त्यामुळे महिला दिनाच्या पूर्व संध्येला अनोखी सुखद भेट या सेविकांना मिळाली आहे.

ग्रामीण भागातील महिला व मुलांना होणार फायदा
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत अंगणवाडयाची सेवा असायला हवी असा आमचा प्रयन्त आहे. मिनी अंगणवाड्याची गरज ओळखून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. याचा फायदा ग्रामीण भागातील महिला व मुलांना होईल असे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील म्हणाल्या

मिनी अंगणवाड्या गरजेच्या
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्याची सेवा कार्यरत आहे. ग्रामीण भागातील मुलांची जडणघडण या अंगणवाडीतून होत असते त्यामुळे मिनी अंगणवाड्या ठिकठिकाणी असायला हव्यात असा आमचा प्रयत्न असेल असे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सपना भोईर यांनी सांगितले

 523 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.