हि तर सुरुवात आहे …

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेत्या प्रभातने व्यक्त केला विश्वास

ठाणे : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डने आतापर्यत माझ्या एकाच कामगिरीची दखल घेतली आहे. भविष्यात त्यांना वारंवार माझ्या नावाची दखल घ्यावी लागेल असा विश्वास विश्वविक्रमी साहसी जलतरणपटू प्रभात कोळीने व्यक्त केला. आगामी ऑगस्ट महिन्यात इंग्लडमधील इंग्लिश खाडीत होणाऱ्या साहसी उपक्रमाच्या पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने प्रभात ठाणे खाडीची पाहणी करण्यासाठी आला होता. त्यावेळी मीठबंदर जेट्टी येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना प्रभातने हा निर्धार व्यक्त केला.
जगातले सहा समुद्र पोहून पार करणारा आणि साहसी खेळासाठी दिला जाणाऱ्या तेनसिंग नोर्गे या राष्ट्रीय पुरस्कारा आणि महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती पुरस्काराचा मानकरी असलेला मुंबईकर प्रभात राजू कोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे. इंग्लडमधील नॉर्थ चॅनेल पोहून पार करणारा सर्वात युवा जलतरणपटू म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रभातच्या कामगिरीची दखल घेतली आहे. प्रभातने ४ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या १९ वर्ष आणि ८ दिवस झाले असताना ३५ किलोमीटरचे अंतर १० तास ४१ मिनिटात पोहून पार केले होते. त्याआधी प्रभातने जपानधील ३४ किलोमीटर अंतराचे शेगुरु चॅनेल वयाच्या १७ व्यवर्षी पोहून पार केले होते. प्रभातने हे अंतर ९ तास ५२ मिनिटात पोहून पार केले होते. त्याच्या या कामगिरीवर वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनने शिक्कामोर्तब केले आहे.
दीर्घ पल्ल्याच्या जलतरणात प्रभातने चांगली छाप पाडलीआहे. मागील एप्रिल महिन्यात प्रभातने वयाच्या १९ व्या वर्षी सहा समुद्र पोहून पार केले.अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण जलतरणपटू होता. प्रभातने २०१५ मध्ये अराऊंड जर्सी ही ६५ किलोमीटर अंतराची सागरी मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यावेळी पाण्याचे तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस आणि सुमारे आठ मीटर उंचीच्या लाटा उसळत असताना प्रभातने हे अंतर १० तास ११ मिनिटांत पोहून पार केले होते. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.हवाई बेटावरील कैवी चॅनेल जलदरीत्या पोहणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे. दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरही जलदरीत्या पोहण्याची कामगिरी प्रभातने साधली आहे.

 520 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.