महिला दिनानिमित्त नगरसेविका परिषा सरनाईक यांनी विहंग चॅरिटेबल च्या वतीने केले अनोख्या सोहळ्याचे आयोजन

ठाणे : अनामिका भालेराव यांच्या रूपाने ठाण्यातून पहिली महिला रिक्षाचालक उदयास आली . त्यानंतर आजच्या तारखेला ठाण्यात जवळपास २५० पेक्षा अधिक परमिट असलेल्या महिला रिक्षाचालकांची संख्या असून प्रत्येक महिला रिक्षाचालकाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. अशा ४० अबोली रिक्षाचालकांना पुस्तकाच्या माध्यमातून बोलकं केलं आहे नगरसेविका परिषा सरनाईक यांनी. यांच्या ” अबोलीचे बोल ” या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १३ मार्च रोजी ठाण्यातील टीप टॉप प्लाझामध्ये होणार असून या प्रकाशन समारंभासाठी नागरविकस मंत्री एकनाथ शिंदे , महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रताप सरनाईक , महापौर नरेश म्हस्के, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, शिवसेना उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी, वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे ,उपमहापौर पल्लवी कदम,विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी,,प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड,नगरसेविका नंदिनी विचारे, आणि जयश्री फाटक, उदयोजक अमित करीया उपस्थित राहणार आहे . या पुस्तकाचे शब्दांकन लेखिका साधना जोशी यांनी केले असून व्यास क्रिएशनने प्रकाशानाची जबाबदारी स्वीकारली आहे . प्रकाशनाच्या दिवशी या महिलांचा सन्मान देखील केला जाणार आहे तसेच यावर्षी माझा ५० वा वाढदिवस आहे त्यामुळे मी ५० चांगली कामे करणार असा मानस केला आहे त्यात महिला दिनाच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरवले अशी माहिती परिषा सरनाईक यांनी दिली आहे .
विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नगरसेविका परिषा सरनाईक यांनी अनेक महिला कँसर रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. या महत्वाच्या उपक्रमाबरोबरच त्यांनी गेले काही महिने महिला रिक्षा चालकांचा जीवनपट देखील जवळून अनुभवला आहे. या अनुभवांचे पुस्तकामध्ये त्यांनी रूपांतर केले असून सर्वसामान्य नागरिकांना ४० महिला रिक्षाचालकांचे अनुभव वाचायला मिळणार आहे. महिला रिक्षाचालकांचा संघर्ष, त्यांना आलेले बरेवाईट अनुभव आणि यांना पुस्तक रूपात मांडण्याचा एक वेगळीच कल्पना परिषा सरनाईक यांच्या मनात आल्याने त्यांनी विचार केल्यानंतर ” अबोलीचे बोल ” हे पुस्तक लिहिले आणि त्याचे शब्दांकन केले लेखील साधना जोशी यांनी. या सर्व महिला रिक्षाचालकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी एका निबंध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.या निबंध स्पर्धेला १२५ महिला रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला असल्याचे परिषा सरनाईक यांनी सांगितले. महिला रिक्षाचालकांवर लिहिण्याची स्फूर्ती माझे पती आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामुळे देखील मिळाली असून ते देखील सुरुवातीला रिक्षाच चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक इतर महिला रिक्षाचालकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपण वातानुकूलित गाडीत प्रवास करून आलो तरी घरी आल्यावर आपली चिडचिड होत असते मात्र ह्या महिला रिक्षा चालक उन्हात, पावसात, हिवाळ्यात या तिन्ही ऋतूंमध्ये त्यातील प्रदूषणात दिवसभर रिक्षा चालवतात आणि घरी जाऊन सर्व कामे करतात त्यामुळे त्या खरंच खूप ग्रेट आहेत असेही यावेळी परिषा सरनाईक यांनी सांगितले.
या पुस्तकांचे शब्दांकन करणाऱ्या लेखिका साधना जोशी यांनी पुस्तकाचा प्रवास सांगितला. ८ महिन्यांचा या पुस्तकाचा प्रवास असून यामध्ये अनेक महिला रिक्षाचालकांना बोलके केले आहे . केवळ कमी शिकलेल्या महिलाच या व्यवसायात उतरल्या नसून अनेक शिक्षित महिला देखील या व्यवसायात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे पुस्तक वाचून महिला रिक्षाचालकांविषयी असलेला शिक्षित महिलांचा दृष्टोकोन देखील बदलेल असा आम्हाला विश्वास असल्याचे साधना जोशी यांनी सांगितले. १३ मार्च रोजी टिपटॉप प्लाझा येथे सायंकाळी ६ वा. या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे .

चौकट

तसेच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेत देखील महिला अग्निशमन दलात दाखल करून घेण्याबाबत महिला दिना निमित्त नगरसेविका परिषा सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका महापौर आणि आयुक्तांना ताशा आशयाचे पत्र दिले आणि सध्या देशात कोरोना हा आजार पसरत आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी मास्क कमी पडत आहेत त्यामुळे आपल्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील महिला बचत गटांतील महिलांना जर कपड्याचे मास्क बनवण्याचे प्रशिक्षण दिले तर महिलांना एक रोजगार देखील मिळेल असेही पत्र नगरसेविका परिषा सरनाईक यांनी दिले आहे.

 479 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.