कोकण विभागात कोरोना विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबई : कोकण विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराबाबत शासकीय पातळीवर सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. जनतेने आवश्यक काळजी घेऊन स्वत:चे आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौड यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोकणातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचा बैठका घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पी.पी.इ.किट्स आणि एन-९५ मास्कची विक्री औषध दुकानातुन केली जाते. या मास्कची मुळ किंमती पेक्षा जास्त आकारणी होत असल्याचे व अनावश्यक खरेदी करून साठा होत असल्याचे निर्देशनास आल्यास तशी तक्रार शासनाकडे करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही दौड म्हणाले.
कोकण विभागात मुंबई शहर, उपनगरासह पाचही जिल्हयात तपासणी पथके, स्कॅनिंगची सोय करण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड यांच्या मदतीने बाहेरहून येणा-या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ८७ हजार प्रवाशांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. कोकणातील जनतेने होळी उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे. सर्व सामान्य जनतेला मास्क घालण्याची आवश्यकता नाही असेही स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.गौरी राठोड, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (नियोजन) बा.ना.सबनीस, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसंचालक (आरोग्य) डॉ. गौरी राठोड यांनी कोरोना विषयक माहिती दिली.

कोकण विभागात कोरोना विषयी नियंत्रण कक्ष स्थापन

कोकण विभागात कोरोना व्हायरस प्रसार प्रतिबंध उपाययोजनेसाठी कोकण भवन येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसे आदेश विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी काढले आहे. या नियंत्रण कक्षात डॉ.बालाजी फाळके वैद्यकीय अधिकारी, पनवेल दूरध्वनी क्रमाक ८८८८८०२८२० , डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन ९८२१८०४८०४ , अनिल पवार गट विकास अधिकारी ८८०५९५१८९९ , दिपक वानखेडे नायब तहसिलदार ९७५७१०८७१७ , यांचा समावेश आहे. या नियंत्रण कक्षात या विषयी प्राप्त होणारे संदेश नोंदविण्यात येतील. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या नियंत्रण कक्षाच्या ०२२ -२७५७१५१६ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 604 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.