मलंगगडावर आगीचे तांडव

वारंवार लागणाऱ्या आगीमुळे संशयाचे वातावरण

ठाणे : अंबरनाथ येथील धार्मिक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलंगगड येथील कुंभार्ली गावच्या डोंगरावर भीषण वणवा पेटल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीच्या वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने शुक्रवारी पहाटे आग आटोक्यात आणली.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्याच वर्षी राज्यात ५३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लोकसहभागातून हाजी मलंग पट्ट्यातील मांगरूळ येथील वन विभागाच्या जमीनीवर ८० भागात एक लाख वृक्षांची लागवड केली होती. तर, गेल्या जुलै महिन्यात अंबरनाथ येथील कोहोज खुंटवली येथील वन विभाग आणि लोकसहभागातून ५८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यावेळीही मांगरूळ येथील वृक्ष लागवडीच्या ठिकाणी लावलेल्या आगीत ७ हजार झाडे जळाल्याप्रकरणी ठाण्यात खासदार शिंदे यांनी मोर्चा काढत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत राख आणि कुंड्या फेकत आपला निषेध व्यक्त केला होता.
या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन सरकारने अंबरनाथचे वन अधिकारी चंद्रकात शेळके यांना दोषी ठरवत निलंबित केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांगरूळ आग प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. वृक्ष लागवडीच्या आगीचे प्रकरण तापत असतांनाच, गुरुवारी रात्रीच्या सुमारास मलंगगड येथील कुंभार्ली गावच्या डोंगरावर भीषण वणवा पेटल्याची घटना समोर आली आहे. तर, वारंवार मलंग गडाच्या डोंगरावर लागणाऱ्या वणव्यामुळे संशयचा धूरही निर्माण झाला आहे.

 607 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.