शिवनेरी, अमर हिंद मंडळ अंतिम फेरीत

मनसे चषक महिला मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धा

मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व मनसे शाखा क्रमांक १९२ च्या सहकार्याने आयोजित मनसे चषक महिला मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धेतील अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा संघासमोर अमरहिंद मंडळाचे आव्हान असेल. ही स्पर्धा केशवराव दाते क्रीडांगण येथे ४ व ५ मार्च या कलावधीत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केली आहे.

महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने ओम सा ईश्वर सेवा मंडळाचा १०-०५ (१०-०३-०२) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरी तर्फे खेळताना मयुरी लोटणकरने नाबाद २:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला, प्रतिक्षा महाजनने १:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन खेळाडू बाद केले तर समीक्षा चव्हाणने नाबाद ३:०० मिनिटे संरक्षण केले. ओम साईश्वर तर्फे खेळताना रश्मी दळवीने १:५० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ खेळाडू बाद केले तर अथश्री तेरवणकरने १:१० मिनिटे संरक्षण करत चांगला खेळ केला.  

महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमर हिंद मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा ०५-०४ (०५-०२-०२) असा १ डाव १ गुणांनी पराभव केला. अमर हिंद मंडळातर्फे खेळताना संजना कुडवने ५:००, नाबाद १:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला, रिद्धी कबीरने २:००, ४:०० मिनिटे संरक्षण केले, रुद्रा नाटेकरने नाबाद २:००, २:३० मिनिटे संरक्षण केले, देविक्षा म्हात्रेने आकमणात ३ खेळाडू बाद केले. तर श्री समर्थ कडून खेळताना भक्ती धांगडेने २:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला अनुष्का प्रभूने २:३० मिनिटे संरक्षण करत जोरदार लढत दिली.

यापूर्वी झालेल्या महिला गटाच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेना या संघाचा (०९-०४) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. दुसर्‍या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने विजय क्लब या संघाचा ०४-०२ ( ०४-०१-०१) असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. तिसर्‍या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लब या संघाचा १०-०६ (१०-०३-०३) असा १ डाव ४ गुणांनी पराभूत केले.

.

 397 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.