राज्याला मिळणार नवा “महाराष्ट्र श्री”

उद्यापासून साताऱ्यात राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठवाचे घमासान

शुक्रवारी प्राथमिक फेरी तर शनिवारी जेतेपदासाठी लढाई

बिलावा, चव्हाण, दिब्रिटो, जाधव जेतेपद दावेदार

मुंबई : १६ व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्यभरातील दमदार आणि जोरदार शरीरसौष्ठवपटूंनी दंड थोपटले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आपल्या सुपर फॉर्मात असल्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत किताबासाठी काँटे की टक्कर होणार असल्याची शक्यता महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र श्री जिंकण्याचा षटकार ठोकणारा सुनीत जाधव यावर्षापासून आयकर खात्याकडून खेळणार असल्यामुळे त्याची जेतेपदाची मालिका यंदा खंडित होणार आहे. त्यामुळे यंदा राज्याला नवा “महाराष्ट्र श्री” मिळणार असल्याचे निश्चित झाले असून जबरदस्त तयारीत असलेला अनिल बिलावा, महेंद्र चव्हाण, महेंद्र जाधव, मुंबई श्री रसल दिब्रिटो, सुशील मुरकर, भास्कर कांबळे, निलेश दगडे यांच्यात “महाराष्ट्र श्री”साठी सातारच्या तालीम संघ मैदानात जोरदार संघर्ष पाहायला मिळेल, यात तीळमात्र शंका नाही.

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेली ‘महाराष्ट्र श्री” राज्य अजिंक्यपद स्पर्धा आजवर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या शहरी भागातच आयोजित केली जात होती. मात्र शरीरसौष्ठवाची गुणवत्ता ग्रामिण भागातही मोठ्या संख्येने आहे. त्या गुणवत्तेला एक मोठे व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने महाराष्ट्र श्रीचे यजमानपद यंदा सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेला देण्यात आले असून या भव्य दिव्य शरीरसौष्ठव महोत्सवाची धुरा शिव छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष क्रीडाप्रेमी रवींद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सातारकरांनाच नव्हे तर शरीरसौष्ठवप्रेमींना शरीरसौष्ठवाचा अनोखा थरार पाहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे यांनी व्यक्त केला. उद्या शुक्रवारी दुपारपासून वजन तपासणी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजल्यापासून प्राथमिक फेरीला सुरूवात होईल. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी प्रत्येक गटातून सहा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. एकंदर पुरूष शरीरसौष्ठव,महिलांच्या शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्ट्स् असे एकंदर तीन गट खेळविले जाणार आहेत.

बिलावा, महेंद्र चव्हाणवर नजरा

महाराष्ट्र श्री आणि सुनीत जाधव हे आजवर एक समीकरणच बनले होते. पण ते समीकरण आता संपुष्टात आलेय. सुनीत नुकताच आयकर खात्यात रुजू झाला असल्यामुळे त्याला नियमानुसार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्यामुळे त्याला महाराष्ट्र श्री स्पर्धेतही खेळता येणार नाही. सुनीतच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेत जेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित झालेय. आजवर प्रत्येक स्पर्धेत जेतेपद आणि किमान सुवर्ण जिंकणारा मुंबईकर अनिल बिलावा महाराष्ट्र श्रीचा दावेदार आहे. त्याची अभूतपूर्व तयारी पाहता त्याला महेंद्र चव्हाण, महेंद्र जाधव, रसल दिब्रिटो, सुशील मुरकर, भास्कर कांबळे रोखण्यात किती यशस्वी ठरतील, याबाबत साशंकता आहे.

अमला ब्रम्हचारीला जेतेपदाचे वेध

गतविजेती अमला ब्रम्हचारीने पुन्हा एकदा आपले सारे लक्ष्य महाराष्ट्र श्री स्पर्धेवर केंद्रित केले आहे. मिस महाराष्ट्रसाठी होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अमला सज्ज झाली असून तिच्यासमोर कुणाचेही तगडे आव्हान उरलेले नाही. मुंबईतून ४ शरीरसौष्ठवपटू उतरणार असून राज्यभरातून किमान सहा-सात महिला शरीरसौष्ठवपटू येणार असल्याची माहिती विक्रम रोठे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही क्रीडाप्रेमींना सौंदर्यवतींचा पीळदार सहभागही पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे फिजीक स्पोर्टस्च्या महिला गटातही स्पर्धकांचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल. एकट्या मुंबईतूनच सहा खेळाडू सहभागी होणार असून ठाणे आणि पुणे येथूनही काही स्पर्धक येणार आहेत. या गटात जेतेपदासाठी मंजिरी भावसारला जोरदार लढत मिळणार आहे. रेणुका मुदलियार आणि दिपाली ओगले चांगल्या तयारीत असल्यामुळे या गटातही वेगळा निकाल लागला तर आश्चर्य वाटणार नाही.

 1,799 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.