जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी हवा आहे ४० कोटींचा निधी

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत अतिधोकादायक ठरविण्यात आली आहे. तसेच या इमारतीतील विविध विभागांचे इतरत्र स्थांलतर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची विभाग ही विखुरलेली आहेत. त्यात ही धोकादायक इमारत पाडून त्या जागी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी शासनस्तरावरून ४० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकत्याच पार पडलेल्या अढावा बैठकीत निवेदनाद्वारे केली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाची इमारत अतिधोकादायक झाल्यामुळे येथील विविध विभागांची कार्यालये हे दुसर्‍या जागी स्थलांतरीत करण्यात आली. येथील सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आला. तर इतर विभागांची कार्यालये ही त्याच आवारात असणाजया इतर इमारतींमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे रिकामे करण्यात आलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यासाठी सद्या निर्लेखन प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाकडून आता एकाच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद मुख्यालयाची उभारणी व्हावी याकरिता नव्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. या नव्या जागेच्या शोधासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीच्या माध्यामतून जागेचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, नुकतेच विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील यांनी जिल्हा परिषदेची मुख्य इमारत अतिधोकादायक झाली असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. तसेच नविन प्रशासकीय इमारत (तळ अधिक आठ मजले) इमारतीसाठी ढोबळ अंदाजित क्षेत्र ७२ हजार १४५ चौ.फुट करिता अंदाजित ५२ कोटींची आवश्यक्ता आहे. त्यापैकी १२ कोटी निधी जिल्हा परिषद घसारा निधी मध्ये असून उर्वरित रक्कम ४० कोटी निधी शासनस्तरावरुन उपलब्ध व्हावा, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 576 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.