‘त्या’ शरीरसौष्ठवपटू तरुणीचा मृत्यू जिम ट्रेनरकडील औषधामुळे

औषध आयुर्वेदिक असल्याचा दावा खोटा


ठाणे : महिन्याभरापूर्वी मृत्यू ओढवलेल्या ठाण्यातील शरीरसौष्ठवपटू मेघना देवगडकर (22) रा.खोपट या तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. नौपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हा गुन्हा कल्याण पोलीस ठाण्यात वर्ग केला होता.मात्र,मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून ऑनलाईन औषध विक्रीविरोधात दंड थोपटलेल्या मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे याना अन्न व औषध प्रशासनाने या संशयास्पद मृत्यूबाबत उत्तर धाडले आहे.यात मृत तरुणीने जिममधील ट्रेनर योगेश निकम याच्या बॅगमधून घेतलेल्या डायनीट्रोफिनॉल या घातक रसायनांच्या औषधामुळे तिचा आकस्मिक मृत्यू ओढवल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर संदिप पाचंगे यांनी,ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन अशाप्रकारे अवैधपणे औषधविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे.
ठाणे पश्चिमेकडील खोपट,हंसनगर परिसरात २२ वर्षीय मेघना आपल्या कुटुंबियांसमवेत रहात होती .शरीरसौष्ठव क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय (ऑल इंडिया) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण येथील एका जिममध्ये तिचा नियमित सराव सुरु होता. ३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास जिममध्ये प्राशन केलेल्या औषधामुळे त्रास जाणवू लागला.यासाठी तिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.परंतु प्रकृती खालावू लागल्याने तातडीने तिला मुंबईला सायन रुग्णालयात हलवण्यात आले असता ४ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू ओढवला होता.मेघनाच्या मृत्यूनंतर ऑनलाईन औषधविक्रीबाबत प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता.त्यावर,अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ – १ च्या सहाय्य्क आयुक्त माधुरी पवार यांनी पाचंगे याना पाठवलेल्या उत्तरात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून ऑनलाईन औषध विक्री होत असल्याची बाब अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.तसेच,मेघना देवगडकर हिने प्राशन केलेले औषध आयुर्वेदिक नसून तिने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगमधून घेऊन सेवन केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू ओढवला असल्याचे प्राथमिक तपास व चौकशी अहवालावरून दिसून आल्याचे म्हटले आहे.सदर घटक असलेल्या औषधाच्या उत्पादन व विक्रीस केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही.असेही स्पष्ट केले.त्यामुळे,या मृत्यूप्रकरणाचा सखोल तपास करण्यासह भविष्यात अशाप्रकारे अवैध औषधविक्री केल्यास कोरोना सारख्या भयंकर विषाणूंचा फैलाव देखील होऊ शकतो अशी भीतीही पाचंगे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

 526 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.