ठामपाच्या तिजोरीचा विनियोग नव्हे, लूट…

विधीमंडळात आ. संजय केळकर यांचा घणाघात

ठाणे : ठाणे महापालिकेचे उत्पन्न आणि राज्य – केन्द्राकडून मिळणार्‍या निधीचा विनियोग होत नसून विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून लूट होत आहे. खुद्द आयुक्तांनीच घोटाळ्यांमध्ये माफीया असल्याचे कबुल केले आहे, असे सांगत आ. संजय केळकर यांनी विधीमंडळात चौकशीची मागणी केली. ठाणे महापालिकेचे विविध करांतून मिळणारे उत्पन्न आणि राज्य – केन्द्राकडून विविध योजनांसाठी मिळणार्‍या कोट्यवधींच्या निधीचा विनियोग होत नसून सायकल, बीएसयुपी, थिमपार्क, बॉलीवुड पार्क आदी  घोटाळ्यांच्या माध्यमातून लूट होत आहे.

अतिक्रमण, टीडीआर, अनधिकृत बांधकामे आदी घोटाळ्यांमध्ये माफीया सक्रीय असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली असे वर्तमानपत्रात वाचण्यात आले त्यामुळे प्रशासनाचे प्रमुखच असे म्हणत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पास ठामपात सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच स्थगिती दिली. अनियमततेबरोबरच कागदपत्रेही नसताना हे प्रकल्प हाती कसे घेतले जातात, असा प्रश्‍न विचारत आमदार केळकर यांनी या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. गेली २५ वर्षे ठामपात शिवसेनेची सत्ता असून घोटाळ्यातून ठाणेकरांची लूट होत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी ठाणेकरांना न्यायालयातच जाऊन न्याय मिळेल काय? असा सवाल आमदार केळकर यांनी केला.

आधीच्या भाजपा सरकारने स्वयंपूनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. मात्र ठामपाने अंमलबजावणीसाठी, जुन्या इमारतींना दिलासा देण्यासाठी काडीमात्र हालचाल केली नाही. या योजनेची तातडीने अंमलबजावी व्हावी, अशी मागणी आ. केळकर यांनी केली. याबरोबरच श्री.केळकर यांनी विविध समस्यांना विधीमंडळात वाचा फोडली. जुन्या इमारतींचे आयुष्यमान वाढावे यासाठी वेदर शेड उभारण्यात आल्या आहेत, त्या नियमानुकूल करण्यात याव्यात, अशी मागणी केळकर यांनी केली. 

ठाण्यातील गावदेवी येथील कायमस्वरुपी सफाई कामगारांच्या ७२ कुटुंबांना २५ वर्षांपूर्वी बेघर करण्यात आले. त्यांची इमारत तोडून त्यांना नवी घरे देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. मात्र अद्याप ही कुटुंबे बेघर आहेत. त्यामुळे या सफाई कामगारांची २५ वर्ष सत्ताधार्यांनी बरबाद केली असे बोलून आ. केळकर यांनी आपला संताप व्यक्त केला. या सफाई कामगारांना तातडीने घरे मिळावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

रेन्टल इमारतींच्या दैनावस्थेबाबतही केळकर यांनी संताप व्यक्त केला. विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरीकांसाठी १० – २० माळ्यांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींमध्ये लिफ्ट नाही, पाणी नाही, घाणीचे साम्राज्य आहे. काही दिवसांपूर्वी लिफ्ट बंद असल्याने एका गरोदर महिलेस १० माळे पायी चढावे लागले. त्यामुळे दुर्दैवाने महिलेचे मिसकॅरेज झाले. घोटाळ्यांतून लूट करण्यापेक्षा या इमारतींवर खर्च करा,असा खोचक सल्लाही श्री. केळकर यांनी दिला. कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येईल, असा निर्णय झाला आहे.त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

गौणखनिज घोटाळा?

ठाणे जिल्ह्यात गौण खनिज प्रकरणी अनेकांकडून शेकडो कोटींची येणी बाकी आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला संबंधितांची यादी दिलेली आहे. मात्र प्रशासन फक्त नोटीसा देण्याचे काम करत असून वसुली शून्य आहे. याबाबत कठोर कारवाई करुन दंडापोटी असलेले कोट्यवधी रुपये संबंधितांकडून तातडीने वसूल करण्यात यावेत, अशी मागणी आ. केळकर यांनी विधीमंडळात केली.

 447 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.