मुलींच्या त्या पहिल्या शाळेच्या वास्तुचे रक्षण करणार

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील ज्या भिडे वाड्यात देशातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि रक्षण केले जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याप्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन खटला सरकार पूर्ण जोर लावून लढेल आणि या वास्तूच्या रक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तू नाबाद १७२ वर्षे

सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील याच भिडे वाड्यात १८४८ साली देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. नुकतीच या ऐतिहासिक वास्तूला १७२ वर्ष पूर्ण झाली. मात्र, एवढ्या वर्षात वाड्याची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. या वाड्याची दुरुस्ती करून तिला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी नागोराव गाणार, प्रा. अनिल सोले, गिरिषचंद्र व्यास, भाई गिरकर, जोगेंद्र कवाडे, स्मिता वाघ, प्रविण दरेकर, रामनिवास सिंह आदी सन्माननीय सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली होती. त्याला उत्तर देताना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेत यासंदर्भातील ठराव मंजूर झाल्याचे सांगितले.

राष्ट्रीय वास्तू घोषित करणार

या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, सदर जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही जागा अद्यापही पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आली नसल्याने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. न्यायालयात गेलेल्या फेरीवाल्यांशी संवाद साधून त्यांचेही समाधान केले जाईल. भिडे वाड्याची वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने हेरिटेज वास्तूंची यादी तयार केली असून, त्यामध्ये या वास्तूचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत योग्य ती कारवाई सुरू आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

 531 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.