प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करा

आमदार गणेश नाईक यांची विधानसभेत मागणी

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्याचे मिळवले शासनाकडून उत्तर

मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रात गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित करण्याची आग्रही मागणी आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्‍न विचारुन केली. या बांधकामांचे सर्वेक्षण सुरु असून ते पूर्ण झाल्यावर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे लेखी उत्तर त्यांनी शासनाकडून मिळवले. या सर्वेक्षणाचा हेतू प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बांधकामांचा मालकी हक्क देणे हाच असला पाहिजे, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.
गरजेपोटीची बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी प्रकल्पग्रस्त, प्रकल्पग्रस्तांच्या संघटना आणि येथील लोकप्रतिनिधी सातत्याने करीत आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी क्लस्टर योजना जाहिर केली मात्र या योजनेत अनेक त्रुटी असल्याने ग्रामस्थांनी या योजनेस विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांनी या योजने संदर्भात दिलेल्या सुचना आणि हरकतींचा विचार करुन त्यांच्या हिताची योजना शासनाने तातडीने आणावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांनी केलेल्या मागणीनुसार सध्या जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड यांच्या मदतीने सिडको गरजेपोटीच्या बांधकामांचे सर्ंवेक्षण करीत आहे. या सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ही बांधकामे नियमित होण्याच्या अनुशंगाने शासनाकडून आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर शासनाच्या वतीने आमदार नाईक यांना देण्यात आले आहे.

 521 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.