शासकीय जागांवरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत

मुख्यमंत्र्यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा

अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्याचा इशारा

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या तसेच शासकीय जागांवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत तसेच त्यावर पुन्हा अतिक्रमणे आल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठाणे जिल्हा आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा, सर्व स्थानिक आमदार, सर्व संबंधित विभागांचे सचिव, महानगर पालिकांचे आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागाविषयीच्या मागण्या मांडल्या.

मीरा- भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळावे यासाठी मागणी होत आहे. या अनुषंगाने अभ्यास करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. घोडबंदर, मीरा- भाईंदर खाडीकिनारा (वॉटरफ्रंट) विकास, अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेट्टींचा विकास, ठाणे शहरामध्ये कोस्टल रोड, उन्नत रस्ते, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन, समुह पुनर्विकास आदी बाबींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत धोकादायक झाल्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव परिषदेने शासनाकडे पाठविल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धोकादायक इमारती बांधण्यासाठी प्राधान्याने निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नतीच्या कामांना मूलभूत विकास कामांसाठीच्या २५- १५ लेखाशीर्षातून निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याची मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिन्याभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत.

माळशेज घाट येथे स्कायवॉक

माळशेज घाट येथे उत्कृष्ट असा काचेचा स्कायवॉक विकसित करण्याचा प्रस्ताव असून पर्यटनाच्या दृष्टीने देशातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले.

उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये कंपन्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदुषित झाली आहे. याबाबत तपासणी करुन कार्यवाही करण्यात येईल.

भिवंडी शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा मोडकळीस आला आहे, अशी माहिती बैठकीत करण्यात आली. पुतळा खराब होणे हे योग्य नसून तातडीने त्याची पाहणी करुन शक्य असल्यास दुरुस्ती अन्यथा नवीन पुतळा उभारणीचे काम करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरुत्व पद्धतीने मिळावे यासाठी कार्यवाही करावी. तसेच घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावे, असेही निर्देश यावेळी देण्यात यावे.

 570 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.