मुरकरने मुंबई श्रीत गमावलेलं परळ श्रीत कमावले

मुरकर झाला “मनीष आडविलकर्सपरळ श्री” च्या रॉयल एनफिल्डवर स्वार

फिजीक स्पोर्टस् मध्ये शुभम कांडू अव्वल तर दिव्यांगांमध्ये हितेश चव्हाणने मारली बाजी

मुंबई : जे मुंबई श्री स्पर्धेत गमावले होते ते प्रभादेवीच्या स्वामी समर्थ व्यायामशाळेच्या सुशील मुरकरने मनीष आडविलकर्स परळ श्री स्पर्धेत कमावले. त्याने अपेक्षेप्रमाणे दिपक तांबीटकर, गणेश पेडामकरसारख्या दिग्गजांना मागे टाकत रॉयल एनफिल्डवर स्वार होण्याचा मान मिळविला. बाल मित्र जिमचा शुभम कांडू अत्यंत अटीतटीच्या लढतीत फिजीक स्पोर्टस् गटात विजेता ठरला तर दिव्यांगाच्या गटात डी.एन. फिटनेसचा हितेश चव्हाण अव्वल आला.

अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या मनीष आडविलकर्स परळ श्रीने आज गर्दीचा उच्चांकही गाठला. परळच्या कामगार मैदानात पार पडलेल्या मुंबई शहरच्या शरीरसौष्ठवपटूंसाठी आयोजित केलेल्या परळ श्री स्पर्धेत मुंगी शिरायलाही जागा नव्हती. शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबई शहरच्या खेळाडूंसाठी मर्यादित असूनही ५५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. माजी महाराष्ट्र श्री आणि आयोजक मनीष आडविलकरने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे बक्षीसांची संख्याही वाढवली. स्पर्धेत सहभागी एकाही खेळाडूला रिकाम्या हाती जाऊ न देण्याचे वचन मनीष यांनी पाळले. त्यांनी फिजीक स्पोर्टस् प्रकारात १० ऐवजी १५ खेळाडूंचा सन्मान केला. विजेत्या खेळाडूंना मनीष आडविलकर, दिनेश पुजारी,अरूणांशू अग्रवाल, अन्सार मोहम्मद, स्पार्टनचे सर्वेसर्वा ऋषभ चोक्सी, भारत श्री श्याम रहाटे, आशीष साखरकर, किरण पाटील, मासचे समीर दाबीलकर आणि सिने अभिनेता आकाश ठोसर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनासाठी प्रोबस्ट, मसल गिअरसारख्या न्यूट्रिशन्सचेही मोलाचे सहकार्य लाभले.

तगडी स्पर्धा, अनपेक्षित निकाल

सुशील मुरकर मुंबई श्रीच्या पराभवाचे दु:ख बाजूला सारून परळ श्री स्पर्धेत उतरला. त्याने मुंबई श्रीप्रमाणे परळ श्री स्पर्धेतही सर्वोत्तम प्रदर्शन करीत बाजी मारली. त्याला दिनेश पुजारी यांच्या हस्ते रॉयल एनफिल्ड देऊन गौरविण्यात आले. फिजीक स्पोर्टस् प्रकार हा खुल्या गटासाठी असल्यामुळे या गटात ५१ स्पर्धकांची उपस्थिती होती. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक आल्यामुळे या गटात १० ऐवजी १५ बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा इतकी तगडी होती की काल मुंबई श्री स्पर्धेत विजेता ठरलेला अरमान अन्सारी या स्पर्धेत पाचवा आला तर पाचवा आलेला विजय हाप्पे दुसरा आला.

पुढच्या वर्षी आणखी पुरस्कार देणार – मनीष आडविलकर

मुंबई शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही परळ श्री आयोजित करतोय. स्पर्धेच्या भव्य दिव्य आयोजनामुळे आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रोख पुरस्कारामुळे उपनगरातील अनेक खेळाडूंचे मला फोन आले. सर्वांची एकच मागणी होती, आम्हालाही खेळायला द्या. या गोष्टीचा आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच विचार करू. पण पुढच्या वर्षी परळ श्री आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित करू. जास्तीत जास्त खेळाडूंना पुरस्कार कसे देता येतील, याचा विचार करूनच २०२१ ची स्पर्धा आयोजित केली जाईल. मला आज जे काही मिळालेय ती शरीरसौष्ठवामुळेच. त्यामुळे मीसुद्धा माझ्या खेळाडूंना जास्तीत जास्त कसं देता येईल ,याचाच विचार करतोय. पुढची परळ श्री यापेक्षा अधिक खेळाडूंना पुरस्कार देणार हे मी आताच सांगतो.

 696 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.