…अन त्यांनी लुटला फुटबॉल खेळाचा मनमुराद आनंद

आठ शाळातील मुले झाली होती युनिफाईड फुटबॉल स्पर्धेत सहभागी

ठाणे : सर्वसाधारण मुलांच्या तुलनेत त्यांचा बुध्यांक खूपच कमी. काहीजणांसाठी तर कायमच कोणाला सोबत ठेवायला लागते. पण याच मुलांचे खेळातील कसब पाहून सगळेच थक्क झाले. निमित्त होते स्पेशल ऑलिम्पिक भारत – महाराष्ट्र शाखा आणि मौर्य फाऊंडेशन आयोजित विशेष मुलांच्या युनिफाईड फुटबॉल स्पर्धेचे. स्पर्धेतील प्रत्येक संघात तीन विशेष मुले आणि दोघा सर्वसाधारण मुलाचा समावेश होता. आपल्यातील उणीवा मागे टाकून खेळाचा जोरदार सराव केला असल्याचे या मुलांचा खेळ पाहून सर्वांच्या लक्षात आले. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात आले. या मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सांघिक विजेते न ठरवता त्यांच्या बुध्यांकानुसार सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके देऊन त्यांना गौरवण्यात आले.
ठाणे शहरात कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच रंगलेल्या या स्पर्धेत विशेष मुलांच्या आठ शाळांचे संघ सहभागी झाले होते. रुस्तमजी अर्बेनिया येथील ऍस्ट्रोटर्फवर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत मानखुर्द येथील एमबीसीएच, वसंत विहार, धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा, नवी मुंबईतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान, रायगड जिल्ह्यातील पेण येथील सूहित जीवन ट्रस्ट, डोंबिवलीतील क्षितिज मतिमंद मुलांची शाळेचे दोन संघ, ठाण्यातील स्नेहालय शाळेच्या खेळाडूंनी फुटबॉलमधील आपले कौशल्य दाखवले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि मौर्य फाऊंडेशनचे संचालक रामजी मौर्य, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राच्या सॅन्ड्रा वाझ यांच्या हस्ते पार पडला.

 507 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.