ठाणे स्मार्ट सिटीच्या डिजी ठाणे उपक्रमाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्ट’ पुरस्काराने सन्मान

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या डिजी ठाणे या उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, युवावर्ग, जयेष्ठ नागरिक यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. डिजीटल युगात नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत असलेल्या डिजी ठाणेची ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रकल्प’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
नुकतेच २८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी- एम्पॉवरिंग इंडिया या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते ठाणे स्मार्ट सिटी लि.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ समीर उन्हाळे यांना डिजी ठाणेसाठी प्राप्त झालेला ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रकल्प’ सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
ठाणे स्मार्ट सिटीज लि. ने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य ही उद्दिष्टे साध्य केली आहे. नागरिकांद्वारे सरकार ते नागरिक, व्यवसाय ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक सेवा देण्यात डिजी ठाणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या वेगवेगळ्या योजनांबरोबरच ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचीही माहिती तात्काळ उपलब्ध् करुन दिली जात आहे. याचबरोबर ठाण्यातील नामांकित दुकाने, हॉटेल्स यांची डिस्काऊंट कुपन्सही या माध्यमातून दिली जातात. आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही डिजीठाणेचे सहाय्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.
डिजीठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. ठाण्यात कोणते उपक्रम राबविणे गरजेचे आहे हे डिजीठाणेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठाणेकर नागरिक सुचवित असतात. यामध्ये ठाण्यातील शाळकरी मुले, युवक,नोकरदार ते सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे उपक्रम या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून राबवले जातात. यामध्ये पक्षाघात व त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणारी कार्यशाळा, योगप्रशिक्षण शिबीर, शाळकरी मुलांसाठी प्रश्नमंजुषा, रक्तदानासाठीचे उपक्रम, राम मारुती रोडवरील शॉपिंग फेस्टिवल, ठाणे युथ आयकॉन स्पर्धा, डिजीमित्र वेबसेमिनार मालिका, छायाचित्र स्पर्धा, क्रिकेट अंदाज स्पर्धा असे अनेक उपक्रम डीजीठाणेद्वारे आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच ठाणे स्मार्टसिटीच्या डिजी ठाणेचा सन्मान हा राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे.

 590 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.