नुबैरशाह शेख याची ग्रँडमास्टर होण्याकडे वाटचाल

फ्रान्समध्ये ३६ व्या कप्पेल्ले ला ग्रँड आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत ‘ मिळवला दुसरा नॉर्म

ठाणे : फ्रान्समध्ये २२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ‘३६ व्या कप्पेल्ले ला ग्रँड आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत’ इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखने दैदीप्यमान कामगिरी करत ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म मिळविला. या स्पर्धेत २२ देशातील ३३२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत १३ ग्रॅण्डमास्टर्स, १९ इंटरनॅशनल मास्टर्स, १८ फिडे मास्टर्स यांचा सहभाग हा या स्पर्धेचा दर्जा व स्तर अति उच्च पातळीचा असल्याचे दर्शवत होता. स्विस लीग पद्धतीने ९ फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत
नुबैरशाहने अपराजित राहत ४ विजय व ५ बरोबरीसह ६.५ गुण मिळविले. सहा ग्रॅण्डमास्टर्स बरोबर खेळताना तोडीसतोड चाली रचत व भारतीय बुद्धिबळ खेळाडू इतर देशांच्या आघाडीच्या खेळाडूंच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करून एकाही स्पर्धकाकडून हार पत्करली नाही. बल्गेरियाचा ग्रँडमास्टर एंचेव इवजलो यास काळ्या मोहऱ्याने खेळताना ३२ चाळीत मात दिली तर पेरू, फ्रान्स, बल्गेरिया व अझरबैजान या देशांच्या ग्रॅण्डमास्टर्सना बरोबरीत डाव सोडण्यास भाग पाडले. त्याची ही अद्वितीय कामगिरी त्यास ग्रॅण्डमास्टरचा २६०० अधिक रेटिंगच्या कामगिरीचा दुसरा नॉर्म मिळविण्यास पात्र ठरली. या स्पर्धेतून त्याने आंतरराष्ट्रीय रेटिंग मध्ये २२ रेटिंग गुण वाढविले. यापूर्वी त्याने जानेवारी २०१८ मध्ये दिल्ली आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला होता. ग्रँडमास्टर हा ‘किताब पटकाविण्यासाठी तीन ग्रँडमास्टर नॉर्म व २५०० आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त करावी लागते. पुढील महिन्यात शारजाह व दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चांगली कामगिरी करून ग्रँडमास्टर होण्यासाठीचा तिसरा व अंतिम नॉर्म मिळविण्यासाठी नुबैरशाह आता कसून सरावास लागल्यामुळे भारताला लवकरच एक नवीन ग्रँडमास्टर व मराठवाड्याला पहिला ग्रँडमास्टर लाभणार आहे.

 697 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.