खांदा कॉलनीतील आठवडा बाजारांची परवानगी रद्द

अप्पर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने नवीन पनवेल सिडकोने परवानगी घेतली मागे

पनवेल: खांदा कॉलनी येथील सिडकोच्या भूखंडावर आठवडा बाजारांना यापूर्वी नवीन पनवेल सिडको कार्यालयातून दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यानंतरही आठवडा बाजार भरले गेल्यास अनुशासनात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोजक संस्थेला पनवेल, कळंबोली सिडको सहाय्यक वसाहत अधिकारी श्रीमती बेडवे यांनी लेखी दिली.
कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या आठवडा बाजारांविरोधात पनवेल संघर्ष समितीने सिडकोचे दक्षता विभागाचे प्रमुख तथा अप्पर पोलिस महासंचालक निसार तांबोळी यांच्याकडे तक्रार केली होती. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्व आठवडा बाजारांचा समावेश आहे.
खांदा कॉलनी येथील सेक्टर ९ मधील भूखंड क्रमांक १० आणि २१ तसेच सेक्टर ५ (पूर्व) येथील डी मार्ट समोरील भूखंड क्रमांक ५१ वरील ५०० चौरस मीटर वरील मोकळ्या भूखंडावर महादेव वाघमारे यांच्या परिवर्तन सामाजिक संस्थेला आठवड्यातून एक दिवस बाजार भरवण्यास सिडकोने परवानगी दिली होती. त्या नुसार अनुक्रमे बुधवार आणि शुक्रवारी ही संस्था आठवडा बाजार भरत होती.
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कुणीही आठवडा बाजार भरत असेल तर पनवेल संघर्ष समितीचा कोणताही विरोध नसेल मात्र, सिडकोने विक्रेत्यांना शेतकरी असल्याचा दाखला देवून परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. याशिवाय कुठल्याही संस्थेला अथवा आयोजकांना कोणत्या निकषाअंतर्गत परवानगी दिली आहे, याची माहिती द्यावी, अशा आशयासोबत सिडकोने परवानगी देताना घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असेल तर आठवडा बाजारांची परवानगी रद्द करावी, अशी मागणी केली होती.
त्या अनुषंगाने निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार नवीन श्रीमती बेडवे यांनी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या दोन्ही आठवडा बाजाराची परवानगी रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे याबाबत पनवेल वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी हे आठवडा बाजार वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने कारवाई करावी, अशी लेखी मागणी त्यांनी पनवेल महापालिका आयुक्तांकडे वारंवार केली होती, अशी माहिती मोहिते यांनी दिली.
याशिवाय भूमापक वसाहत क्रमांक ३ च्या अधिकाऱ्यांकडून आठवडा बाजारासाठी वापरण्यात आलेल्या जागेचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
आठवडा बाजाराला परवानगी नाकारल्याच्या आदेशाची प्रत श्रीमती बेडवे यांनी अधीक्षक अभियंता सिडको, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खांदेश्वर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक, मुख्य नियंत्रण अनधिकृत बांधकाम विभाग, अग्निशमन अधिकारी, सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी, पनवेल महापालिका आयुक्त, मुख्य दक्षता अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.