कांबळे साकारणार स्वप्न की मुरकर मारणार बाजी

स्पार्टन मुंबई श्रीचा फैसला आज

क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला, आज अंधेरीत अंतिम थरार
 
मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल अशा पीळदार सौंदर्यासह सुरू झालेल्या “स्पार्टन मुंबई श्री” जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईची ताकद अवघ्या देशाने पाहिली. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटातील १५४  खेळाडू आणि फिटनेस फिजीकच्या शतकी सहभागामुळे “स्पार्टन मुंबई श्री” पुन्हा एकदा पावरफुलल् हिट ठरली. प्रत्येक गटात मुंबईचे पीळदार भवितव्य उतरल्यामुळे प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी खेळाडूंना प्रचंड संघर्ष करावा लागला. शरीरसौष्ठवाच्या एकंदर नऊ गटातून अंतिम फेरीसाठी 59 खेळाडूंची निवड केली असली तरी “स्पार्टन मुंबई श्री”चा फैसला भास्कर कांबळे, सुशील मुरकर, निलेश दगडे, दिपक तांबीटकर, उमेश गुप्ता आणि नवा चेहरा असलेल्या रसेल दिब्रिटो यांच्यात रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. फिटनेस फिजीक प्रकारात खेळाडूंच्या आकड्याने शंभरी गाठल्यामुळे दोन गटातून अंतिम फेरीसाठी १४  खेळाडूंची निवड करताना जजेसना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.

अंधेरीचे सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लब हे स्पार्टन मुंबई श्री निमित्ताने शरीरसौष्ठवाच्या आखीवरेखीव आणि पीळदार स्नायूंच्या देहांनी फुलून निघाले होत. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने पुन्हा एकदा “स्पार्टन मुंबई श्री”चं दिमाखदार आणि ग्लॅमरस सोहळा आयोजित करून आपल्या खेळाची ताकद दाखवून दिली. स्पर्धेला नेहमीप्रमाणे विक्रमी उपस्थिती लाभल्याने आयोजकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. “स्पार्टन मुंबई श्री”ने आज देखण्या आयोजनाचा आणि स्पर्धकांच्या विक्रमी उपस्थितीचा एव्हरेस्ट सर केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत यांनी अभिमानाने सांगितले.
 
आज झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून अव्वल सात खेळाडूंची निवड करताना जजेसच्या अक्षरश: घामटा निघाला. ५५  किलो वजनी गटातून ओंकार आंबोवकर, शशांक सकपाळ, अजिंक्य पवार, नितीन शिगवण, राजेश तारवे, किशोर कदम आणि नितेश कोळेकर या कसदार खेळाडूंपैकी कोण अव्वल ठरेल हे सांगणे कठिण आहे. ६०  किलो वजनी गटात अरूण पाटील, प्रवीण श्रीवास्तव, गणेश पारकर, विजय लाड, प्रीतेश गमरे, देवचंद गावडेपैकी एक जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरू शकतो. “छोटा बॉम्ब” म्हणून प्रसिद्ध असलेला उमेश गुप्ता ६५  किलो वजनी गटात धमाका करणार हे स्पष्ट आहेच, पण त्याचे पीळदार स्नायू “स्पार्टन मुंबई श्री”च्या लढतीतही स्फोट घडवू शकतो, असा अंदाज शरीरसौष्ठव तज्ञच वर्तवत आहेत. या गटात चेतन खारवा, “ज्यूनियर मुंबई श्री” वैभव जाधव, शैलेश गायकवाड, तेजस भालेकर आणि बप्पन दासशी त्याची गाठ पडेल. स्पर्धेतला सर्वात गर्दीचा गट म्हणजे ७०  किलो वजनी गट. यात सर्वाधिक ३७  खेळाडू याच गटात होते आणि यातून सात खेळाडू निवडताना जजेसना आपले कौशल्य पणाला लावावे लागले. या गटात मनोज मोरे, संतोष भरणकर, चिंतन दादरकर, “नवोदित मुंबई श्री” गणेश उपाध्याय, आशीष लोखंडे, राहुल तर्फे,उमेश पांचाळसारखे आपला जोर दाखवतील. ७५  किलो वजनी गटात भास्कर कांबळे आपले “स्पार्टन मुंबई श्री”च्या जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वोत्तम तयारीत दिसत असल्यामुळे तो उद्या अंतिम फेरीत सुजीत महापात्रा,रोनीत कदम, सिद्धांत यादव, रोहन गुरव, अर्जुन पुंचीकोरवे आणि अमित साटम यांना सहज मागे टाकेल, यात तीळमात्र शंका उरलेली नाही.
 
सुशील मुरकरसमोर कडवे आव्हान

 गतवेळचा हॉट फेव्हरेट सुशील मुरकरला आपल्या ८०  किलो वजनी गटात कडवे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सुशांत रांजणकर, प्रफुल प्रधान, अभिषेक खेडेकर,  स्वप्निल मांडवकर, गणेश पेडामकरसारखे एकापेक्षा एक असे खेळाडू असल्यामुळे सुशीलला अंतिम फेरीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. ८५  किलो वजनी गटात दिपक तांबिटकरला अव्वल स्थान मिळविताना फार झगडावे लागणार नाही. या गटात नितीन कोळी,संतोष यादव, कल्पेश नरडेकर, अविनाश हिरोजी, कुमार पेडणेकर हे जोरदार खेळाडू आहेत. दोन वर्षांपूर्वी उपविजेता ठरलेला सकिंदर सिंग तयारीत नसतानाही या स्पर्धेत उतरला आणि त्याच्यावर गटातच बाद होण्याची नामुष्की ओढावली. यंदाच्या स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणारा खेळाडू  ठरला ९०  किलो वजनी गटातला रसेल दिब्रिटो. फारच कमी स्पर्धांमध्ये उतरलेल्या रसेलची आखीवरेखीव देहयष्टी पाहून सारेच चक्रावले होते. त्याच्या जोशपूर्ण सहभागामुळे स्पार्टन मुंबई श्रीच्या जेतेपदाची चुरस आणखीन वाढली आहे. आज गटातून तो अव्वल आला तरी याबाबत कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. या गटात त्याला अरूण नेवरेकर, महेश राणे, सम्राट ढाले, उबेद रियाज पटेल, विजय जाधव यांच्याशी त्याची लढत असेल. तसेच स्पर्धेतल्या सर्वात वजनदार गटात निलेश दगडेचे अव्वल स्थान अबाधित राहिल,असा अंदाज आहे. या हेवीवेट गटात प्रसाद वाळंज आणि येशूप्रभू तलारी असेच तीनच खेळाडू असल्यामुळे प्राथमिक फेरीत कसलीही चुरस दिसली नाही. मात्र अन्य गटातील अभूतपूर्व सहभागामुळे यंदाचा स्पार्टन मुंबई श्रीचा विजेता छोटा बॉम्ब ठरतोय की अनुभव बाजी मारतो, याकडे समस्त शरीरसौष्ठवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
 
फिजीक स्पोर्टस् प्रकारात काँटे की टक्कर
 
फिटनेस फिजीकची दिवसेंदिवस क्रेझ वाढत असल्यामुळे या स्पर्धेच्या दोन गटांमध्ये स्पर्धकांची संख्या शंभरी पलीकडे पोहोचली होती. या गटातून प्रत्येकी सात-सात खेळाडू निवडणे म्हणजे हा त्या खेळाडूंवर अन्यायच होता. प्रचंड मेहनत करून उतरलेल्या या मॉडेल शरीरसौष्ठवपटूंची स्टेजवरची गर्दी मुंबई श्रीचा उत्साह वाढवणारी होती. अत्यंत चुरशीच्या १७०  सेमी उंचीच्या या गटातून अरमान अन्सारी, विजय हाप्पे, अनिकेत चव्हाण, गतविजेता महेश गावडे, केतन सावंत, अविनाश जाधव आणि प्रशांत लाड यांची निवड केली तर १७०  सेमीपेक्षा उंचीचा गटातून जगदीश स्वामी, आतिक खान, अभिषेक पाडगावकर, मितेश ठाकर, अली अब्बास, स्वराज सिंग, संतोष पुजारी आणि प्रसाद तोडणकर यांची अंतिम फेरीसाठी वर्णी लागली. फिजीक फिटनेसचा एक गट महिलांचाही असून हा गट शनिवारी थेट स्पर्धेत उतरेल तर महिलांची बहुप्रतिक्षीत शरीरसौष्ठव स्पर्धाही आकर्षणाचे प्रमुख केंद्र असेल.

 570 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.