वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाणवून अंधश्रद्धा निर्मूलन करा

एकलव्य परिवर्तन विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न

ऊसगाव डोंगरी : एखादी घटना का घडते ? घटनेची कारण मीमांसा काय असते.? असे प्रश्न -उपप्रश्न विद्यार्थ्यांना सतत पडले पाहिजेत. ज्यांना असे प्रश्न पडतात ते चौकस असतात आणि तेच पुढे शास्त्रज्ञ झालेले दिसतात. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल, घटनांबद्दल , मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल मी शेवटपर्यंत शोध घेईन.असे विध्यार्थ्यांना वाटले पाहिजे. …. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलसारख्या साधनांच्या माध्यमातून शोधून त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे.असे झाले तर आपल्या सभोवताली , शाळेत, सगळीकडेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. असे सांगून , थोर भारतीय ऋषी मुनींनी आयुर्वेदाच्या ज्ञानाचा मोठा ठेवा जगाला दिला.शून्याचा शोध भारतीयांनी लावला. जगाच्या वैज्ञानिक ज्ञानात भारतीयांनी मोलाची भर घातली आहे. हा विज्ञानाचा वारसा विद्यार्थीनींनी पुढे चालवावा, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवून सभोवतालच्या समाजातील, स्वतःच्या कुटुंबातील अंधश्रद्धा दूर कराव्यात. असे प्रतिपादन विधायक संसदच्या संस्थापिका व सचिव विद्युल्लता पंडित यांनी एकलव्य परिवर्तन विद्यालयाने साने गुरुजी प्रशिक्षण संकुल , ऊसगाव डोंगरी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना केले. शाळेतील राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित विज्ञान प्रदर्शन, मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम, विज्ञान जिज्ञासा अंक इत्यादींच्या आयोजनासाठी सहभागी विद्यार्थीनी, शाळेचे मुख्याध्यापक भूपेंद्र कर्वे (माध्यमिक), उमेश पष्टे (प्राथमिक), प्रियांका मोगरे, विद्यार्थींनी परिणिता नानकर यांचेसह सर्व शिक्षकांनी केलेली धावपळ आणि मेहनत मी प्रत्यक्ष पाहिली आहे. कार्यक्रमातील सर्वानी चांगली माहिती दिली. असल्याचे सांगत विद्युल्लता पंडित यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या सुरूवातीला नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी व्ही रमण आणि कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि व संस्थेचे संस्थापक विवेकभाऊ पंडित यांनी रचलेल्या ” स्वप्न माझ्या जीवनाचे-मूर्त रुपाला दिसू दे ” या प्रार्थनेने झाले तर विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन विद्युल्लता ताई यांचे हस्ते फित कापून आणि कार्यक्रम स्थळी तयार केलेल्या छोट्याशा प्रातिकात्मक रॉकेटचे लॉन्चिंग सहसचिव प्रदिप खैरकर यांचे हस्ते करून करण्यात आले. विद्यार्थीनींनी सबको शुभ कामना ह्या सुरेल आवाजातील स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.शाळेच्या शिक्षिका योगिता मराठे यांनी मराठी भाषा गौरव दिनाबद्दल तर प्रियांका मोगरे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने सी. व्ही रमण यांच्या वैज्ञानिक जीवन कार्याची ,प्रकाशाचे विकिरण या शोधाची माहिती प्रास्ताविका मध्ये दिली. स्वरा पष्टे यांनी ” मानव समाजासाठी विज्ञान क्रांतीतून झालेल्या लाभ हानीची माहिती सांगून विज्ञानाच्या क्रांतीचा मानवाने जीवनात विवेकाने उपयोग केला पाहिजे.”असे मनोगत कार्यक्रम संचालना मध्ये मांडले. त्यानंतर विद्यार्थीनींनी ” संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा आता उदेला.” हे कार्यक्रमाला अनुरूप समूहगीत गायले.दिपीका पागी, तनुजा वाघात,पुनम जाधव, वैष्णवी नानकर यांनी कार्यक्रमप्रसंगी आपले विचार मांडले. स्पर्धा चाफेकर यांनी कुसुमाग्रजांच्या ” साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा. मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा ” ही कविता सादर केली. शिक्षक आणि विध्यार्थ्यानी परिश्रम पूर्वक तयार केलेल्या हस्तलिखित ” विज्ञान जिज्ञासा अंकाचे ” प्रकाशन यावेळी विद्युल्लताताई पंडित यांचे हस्ते करण्यात आले.स्पर्धा चाफेकर ,सागर पाटिल आणि प्रियांका मोगरे यांनी हसत खेळत सादर केलेल्या वैज्ञानिक व जादूच्या प्रयोगांतून कार्यक्रमात मजा तर आणलीच, त्याशिवाय विज्ञानाचा संदेश उपस्थित विद्यार्थीनींना दिला.

विधायक संसदचे सहसचिव प्रदिप खैरकर यांनी खूप मेहनतीने विध्यार्थीनींनी व शिक्षकांनी कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व आज संपूर्ण देशात धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे सांगून मानवाच्या आजवरच्या विकासात कोणत्याही धर्मापेक्षा वैज्ञानिकांनी मानव जातीच्या भल्यासाठी केलेली कामगीरी श्रेष्ठ असल्याचे यावेळी म्हटले. व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या समतेच्या चळवळीतील नाशिक मधील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा त्यावेळी कुसुमाग्रजांच्या तरुण मनावर खोल परिणाम झाला होता असे सांगून समतेच्या लढ्यात कुसुमाग्रजांनी तेव्हा घरच्या मंडळींचा विरोध पत्करून काम केले होते, असे सांगितले.श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी त्यांच्या भाषणात विज्ञान प्रदर्शन आणि मराठी दिनाच्या कार्यक्रम आयोजनाबद्दल सर्व शिक्षक व विध्यार्थीनींचे कौतुक केले. कार्यक्रम सभेच्या समाप्तीनंतर विद्युल्लता पंडित, रामभाऊ वारणा , केशव नानकर, प्रदिप खैरकर, किसन चौरे यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विध्यार्थीनींनी मांडलेल्या विज्ञान प्रयोगांची माहिती घेतली. त्यांच्या मांडणीचे तोंडभरून कौतुक केले. पारोळ जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यानी व शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्युल्लताताई यांनी त्यांच्या राष्ट्र सेवा दलात शिकलेले ” गतकाळाची होळी झाली-पुराण तुमचे तुमच्यापाशी.” हे गीत विध्यार्थीनींनी समवेत सामूहिकपणे म्हटले. स्वरा पष्टे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम प्रसंगी श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, संस्थेचे सहसंचालक किसन चौरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजनात स्नेहा थुळे, साक्षी जाधव ,पुनम पागी , एकता जाधव , सुभाष काचरे , मनिष भाटकर , राजेश जाबर,निलेश नाईक, अजय देसाई , अक्षय पाटिल यांच्या प्रमुख भूमिका राहिल्या.

 592 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.