ठाणेकरांनी केला `भारतरत्न सावरकर’चा गजर

भाजपतर्फे आयोजित `अथांग सावरकर’ कार्यक्रम हाऊसफूल

ठाणे : लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा पदव्या सरकारने नव्हे जनतेनेच दिल्या होता. आता कोणीही व्यक्ती नुसतं गांधी म्हणत नाही. तर महात्मा गांधी असेच म्हणतो. आपणही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर' असंच म्हणायचं, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी करताच शेकडो ठाणेकरांनी केलेल्या 'भारतरत्न सावरकर'च्या गजराने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुमदुमले. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने भाजपा ठाणे शहरतर्फे आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांचाअथांग सावरकर’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, परिणय फुके, ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, भाजपाच्या प्रदेश महिला अध्यक्षा माधवीताई नाईक आदी उपस्थित होते. शिवसेनेने करमणूक नसल्याने नाकारलेला `अथांग सावरकर’ हा कार्यक्रम भाजपातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आयोजित केला होता. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रखर राष्ट्रीय विचार अजरामर गीतांसह सादर करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर उगाचच टीका केली जाते. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव होण्यासाठी जनतेने सरकारची वाट पाहू नये. आपण भारतरत्न सावरकर म्हणण्यास आजपासूनच सुरुवात करू या, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले. ने मजसी ने परत मातृभुमीला… या अजरामर गीतासाठी तरी सावरकरांना भारतरत्न द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील पहिले टपाल तिकीट काढले होते. तर दादर येथे शिल्प उभारण्यासाठी बॅंकेतील स्वत:च्या खात्यातून १५ हजार रुपये दिले होते. त्यामुळे ज्यांना आपल्या आजीचा इतिहास माहिती नाही, त्यांनी टीका करु नये, असा टोला शरद पोंक्षे यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता मारला. त्यांची गोळवलकर बोलताना जीभही वळत नाही, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीरांविषयी जनतेच्या मनात कायम प्रेम आहे. मात्र, सावरकरांच्या जन्मभूमीतच त्यांच्या सन्मानाचा प्रस्ताव आणता येत नाही, हे दुर्देव आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सत्तेसाठी लाचार झालेल्यांना सावरकरांना सन्मानित करावे असे वाटत नाही, याबद्दल दरेकर यांनी खंत व्यक्त केली. सावरकर हा मनोरंजनाचा विषय नसल्याचे म्हणणाऱ्यांना देव सुबुद्धी देईल, अशी आशा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.
आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. सावरकरांचे विचार समजून न घेता काही लोकांकडून एंटरटेनमेंटचा पदर दिला जातो. मात्र, सावरकर म्हणजे एक तप, एक विचार आणि एक तेज आहे. त्यांचे प्रखर विचार पोचविण्यासाठी ठाणेकरांपुढे कार्यक्रम सादर केला जात आहे, असे निरंजन डावखरे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी स्वा. सावरकरांच्या सुनबाई सुंदरकाकू विश्वासराव सावरकर व स्वा. सावरकरांच्या नात असिलता सावरकर-राजे यांनी खास शुभेच्छा संदेश पाठविला होता. या वेळी यमुनाताई सावरकर यांच्या चरित्र लेखनाबद्दल लेखिका साधना जोशी यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून मराठी भाषा समृद्ध : पोंक्षे
मराठी ही समृद्ध भाषा आहे. स्वातंत्र्यवीरांनी मराठी भाषेला शाळा, प्रशाळा, महाविद्यालय, परिपत्रक, आचार्य, मूकपट, मध्यंतर, छायाचित्र, भित्तीपत्रक, लढाई, शस्त्रसंधी, अभियान, पाणबुडी आदी अनेक शब्द दिले. या शब्दांनी मराठी भाषेच्या समृद्धीत भर पडली, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

 440 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.