फिरत्या शौचालयाला लावली आग

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मानपाडा रोडला असलेल्या डी मार्ट नजीक कल्याण-डोंबिवली महापलिकेच्यावतीने फिरते शौचालयाची सुविधा करण्यात आली होोती मात्र समाजकंटकाने तब्बल ११ लाखांच्या फिरत्या शौचालयालाच आगीच्या हवाली केले. या आगीत शौचालय संपूर्ण जळून खाक झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाकडून शहर हागणदारीमुक्त व उघड्यावर नागरिकांनी शौच करायला नको म्हणून पालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात फिरत्या शौचालयांच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाकडे १५ फिरती शौचालये असून त्यापैकी ५ ते ६ शौचालये नादुरुस्त होऊन बंद अवस्थेत आहेत. फिरत्या शौचालयाची देखभाल व दुरूस्ती पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात येते. डोंबिवलीत मानपाडा रोडला असलेल्या डी मार्टनजीक नागरिकांनी एका फिरत्या शौचालयाची मागणी केली होती. या मागणीनुसार तब्बल ११ लाखांचे फिरते शौचालय नागरिकांना उभे करून ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारच्या सुमाराला कोण्यातरी अज्ञात समाजकंटकाने या शौचालयालाच आगीच्या हवाली केले. ही आग एवढी भयंकर होती की, आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले होते. एका रहिवाशाने अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाची १ गाडी दाखल होवून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यत संपूर्ण शौचालय जळून खाक झाल होते.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.