डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2026 ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रव‍िवारी (17 मे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे शहरात सर्वधर्मीय मिरवणूक काढण्यात आली होती तसेच राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड गर्दीने भरलेले सभागृह हीच डॉ. बाबासाहेबांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला मजबूत करुन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे उद्गगार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.

या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सभागृह नेते हणमंत जगदाळे, उपायुक्त दीपक झिंजाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, कार्याध्यक्ष बुध्दभुषण गोटे, भास्कर वाघमारे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, रामभाऊ तायडे, पंढरीनाथ गायकवाड, सरचिटणीस संजय भालेराव, डी.एफ. सावंत, संदीप खांबे, खजिनदार महेंद्र अनभोरे, प्रसिध्दी प्रमुख राहूल लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील उपस्थितांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. ठाणे स्टेशन परिसरातून राम गणेश गडकरी रंगायतनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पथ मार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच आंबेडकरी अनुयायांनी घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. यावेळी अंश‍ित कांबळे या चार वर्षीय मुलाने भीमगर्जना आणि शिवगर्जना सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक आनंद शिंदे आणि सहकाऱ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण केले, या गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 124 total views,  3 views today