मुंबई अजिंक्यपद, आंतर शालेय सायकलिंग स्पर्धा
मुंबई : सिद्धार्थ दवंडेने अवघ्या २५ सेकंदाने बाजी मारत मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटना आयोजित मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आंतरशालेय स्पर्धेत हृतिक सोनी, वेदांत पानसरे आणि प्रजिन नाडर विजेते ठरले.
मुंबई अजिंक्यपद स्पर्धेत मुस्तफा पत्रावालाने चांगले आव्हान उभे केले होते. पण २० किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत शेवटच्या टप्प्यात सिध्दार्थने २५ सेकंदाच्या फरकाने मुस्तफाला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. वांद्रे कुर्ला संकुलात रंगलेल्या या स्पर्धेत सिध्दार्थने ही शर्यत २९:०५:९ सेकंदात पूर्ण केली .मुस्तफाने दुसरे स्थान मिळवताना २९:३०:०० सेकंदात पूर्ण केले. त्यापाठोपाठ २९:४०:०० सेकंदात शर्यत पूर्ण करणाऱ्या ध्रुव बोत्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शालेय स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात हृतिक सोनी विजेता ठरला. त्याने २ किलोमीटर अंतराची शर्यत ४: ०७: ४३ सेकंदात पूर्ण केली. या गटात सर्वस्वी देव पटेल (४:३५:०९ सेकंद),आयुष जैन (५:०५:८५ सेकंद) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले. १६ वर्ष गटात वर्चस्व राखताना वेदांत पानसरेने ६:१३ सेकंदात ४किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. दुसरे स्थान मिळवताना शार्दूल म्हात्रेने ६:५७ सेकंद अशी वेळ नोंदवली. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या आयुष चव्हाणने ७:०७ सेकंदात हे अंतर पार केले. प्रजिन नाडरने ६:३४ सेकंद अशा कामगिरीसह १९ वर्ष गटाच्या ६ किलोमीटर अंतराच्या शर्यतीचे विजेतेपद मिळवले. आयुष पवारने ७:०७ सेकंद अशा वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला.
185 total views, 2 views today