पाणी साठवण क्षमता वाढवा; नवीन बांधकामांना रोखा

आमदार संजय केळकर यांनी पाहणी दौऱ्यात दिला पाणी टंचाईवर उतारा..

ठाणे : घोडबंदरसह शहरातील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या जलकुंभांच्या बांधकामाची पाहणी करत आमदार संजय केळकर यांनी कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. तर पाणी टंचाई रोखायची असेल तर पाणी साठवण क्षमता वाढवताना नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी न देण्याबाबतही पुनरुच्चार त्यांनी केला.
घोडबंदरसह शहरात पाणी टंचाई सातत्याने भेडसावत असल्याने शहरात जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. आमदार संजय केळकर यांनी लोढा स्टर्लिंग येथील ३० दशलक्ष लिटरची टाकी, वैकुंठ पिरामल येथील २५ दशलक्ष लिटर पाण्याची टाकी, कल्पतरू येथील २५ दशलक्ष लिटर पाण्याची टाकी आणि दोस्ती काउंटी येथील ३० दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची पाहणी केली. पावसाळा संपला असून पुढील काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार आहे. शहरात नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर या जलकुंभांचे बांधकाम दर्जेदार व्हावेच, शिवाय कामाचा वेगही वाढवावा, अशा सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
ठाणे शहराला अतिरिक्त पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी मी मागणी केली असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. मात्र त्याचवेळी शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढत आहे. परिणामी सर्वाधिक बांधकामे सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला पाणी टंचाईची वर्षभर झळ बसते. त्यामुळे एकीकडे पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करत असताना नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, याचा पुनरुच्चार ठामपा आयुक्तांच्या बैठकीत केला आहे. याबाबत मी अधिवेशनात आवाज उठवला असून संबंधित विभागाशीही पाठपुरावा केला आहे, अनेक आंदोलने केली असून याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तरीही शहरात मोठ्या प्रमाणात शेकडो इमारतींची कामे सुरू आहेत. मग या नवीन रहिवाशांना पुरेसे पाणी मिळणार कसे? त्यामुळे या नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, तरच पाणी टंचाईची झळ कमी होईल, याचा पुनरुच्चार आमदार केळकर यांनी पाहणी दौऱ्यात केला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान उप अभियंता अतुल कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे साने तसेच परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपचे मंडल अध्यक्ष ॲड.हेमंत म्हात्रे, कैलास म्हात्रे, राकेश जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 3,849 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.