कडव्या लढतीनंतर दिपीत ठरला अजिंक्य

महिला गटात पुण्याच्या प्रिथा वर्टिकरने मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले.

ठाणे : विद्यमान राज्य विजेता आणि अव्वल मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलने आपला संघ सहकारी आणि दुसरा मानांकित सिद्धेश पांडेंची कडवी लढत मोडीत काढून रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब सीकेपी ज्ञाती गृह ट्रस्ट आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात पुण्याच्या प्रिथा वर्टिकरने मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले.
पुरुष गटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली. सातव्या गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात दिपीतने ११-१ असा सहज पहिला गेम जिंकून दमदार सुरुवात केली. पण सिद्धेशने दुसरा आणि तिसरा गेम ११-६, ११-४ असे जिंकत दिपीतसमोर आव्हान उभे केले. चौथ्या गेममध्ये १३-११ अशी सरशी मिळवून दिपीतने पाचवा गेम ११-५ असा जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. पण सिद्धेशने सहाव्या गेममध्ये पुन्हा एकदा उभारी घेत १३-११ अशा विजयासह सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र दिपीतने सिद्धेशला ११-६ असे मागे टाकत यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. याआधी दिपीतने सांगलीत खेळवण्यात आलेली पहिली गुणांकन स्पर्धा जिंकली होती.
याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत दिपीतने मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमय्याची लढत १०-१२, ११-५,५-११, ११-५,११-७,११-९ अशी जिंकली. तर सिद्धेशने कोल्हापूरच्या अनिश सोनटक्केवर ११-६, ११- ४, ११-४,११-७ असा विजय मिळवला होता.
महिलांच्या अंतिम लढतीत पुण्याच्या १९ वर्षीय प्रिथाने १३ व्या मानांकित मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीवर ७-११,११-४, ७-११, ११-९, ११-८, ११-७ विजयाचे ७५०० रुपयांचे बक्षीस आपल्या खात्यात जमा केले. उपांत्य फेरीत प्रिथाने मुंबई शहराच्या सेन्होरा डिसूझाचा तर रिशाने अग्रमानांकित श्रुति अमृतेला हरवणाऱ्या समृद्धी केळकरचे स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणले होते.

 11,127 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.