समृद्धीने श्रुतीला चकवले

ठाण्याच्या अव्वल मानांकित दिपीत पाटिलने तिसऱ्या मानांकित मुंबई शहराच्या पार्थव केळकरवर सरळ विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

ठाणे : सोलापूरच्या आठव्या मानांकित समृद्धी कुलकर्णीने उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकित ठाण्याच्या श्रुती अमृतेला पराभवाचा धक्का देत चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिला गटात खळबळ उडवली. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब सीकेपी ज्ञाती गृह ट्रस्ट आयोजित स्पर्धेत ठाण्याच्या अव्वल मानांकित दिपीत पाटिलने तिसऱ्या मानांकित मुंबई शहराच्या पार्थव केळकरवर सरळ विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
महिलांच्या लढतीत समृद्धीने पहिले दोन गेम ११-४, ११-९ असे जिंकत सामन्यावर पकड मिळवली होती. तिसऱ्या गेममध्ये श्रुतीने पुन्हा उभारी घेताना ११-४ अशी सरशी मिळवत आव्हान कायम राखले. पण चौथ्या गेममध्ये समृद्धीने श्रुतीचा प्रतिकार ११-६ असा मोडीत काढत उपांत्य फेरीतले आपली जागा निश्चित केली. अन्य लढतीत  मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीने आपली संघ सहकारी पाचव्या मानांकित अनन्या चांदेचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आणले. रिशाने हा सामना ११-८, ११-९,४-११, ११-८ अशा फरकाने जिंकला.
पुरुषांच्या लढतीत दिपीतने मुंबई शहराच्या पार्थव केळकरवर ११-५, १२-१०, ११-४ असा सोपा विजय मिळवला. अन्य लढतीत मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकित चिन्मय सौमय्याला बिगर मानांकित पुण्याच्या शौनक शिंदेने विजयासाठी घाम गाळायला लावला. चिवट झुंजीनंतर चिन्मयने हा सामना ७-११, १२-१०, ११-८, ९-११, ११-४ असा जिंकला.

 2,334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.