गणनायका विश्वनायका-लोकमत व डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या गणेश दर्शन स्पर्धेचा  पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

”गणनायका विश्वनायका” या थीमवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

ठाणे : इको फ्रेंडली गणेश दर्शन स्पर्धा २०२३ या लोकमत व डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या (वर्ष ४थे) गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. ”गणनायका विश्वनायका” या थीमवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या स्पर्धेसाठी ठाणे शहरातून १०५ स्पर्धक निवडण्यात आले होते. त्यात दीड दिवसाचे, पाच व दहा दिवसाचे घरगुती व अंदाजे ४५ ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती. सुबक मूर्ती, इको फ्रेंडली सजावट, समाजाला एक विशेष संदेश देणारी थीम अशा अटीतटीच्या स्पर्धेतून परीक्षकांनी उत्कृष्ट अशा १८ गणपतींची निवड केली. त्यात परीक्षकांची भूमिका मोलाची होती. या स्पर्धेसाठी अंदाजे दीड लाखांची बक्षिसे, ट्रॉफी व सन्मान चिन्ह देण्यात आली. यात ‘सेल्फी विथ गणेशा’ या विभागात प्रथम पारितोषिक रोख रुपये पाच हजार व सन्मान चिन्ह सिद्धेश्वर मिश्रा यांना मिळाले. घरगुती विभागात उत्कृष्ट गणपतीचे पारितोषिक रोख रुपये अकरा हजार व सन्मान चिन्ह  प्रसाद रवींद्र बिर्जे यांना मिळाले. तसेच सार्वजनिक गणेश देखावा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये पन्नास हजार व सन्मान चिन्ह पोलीस मुख्यालय गणेशोत्सव मंडळ यांच्या ‘गुंतता हृदय हे’ या थीम साठी मिळाले. तर दुसरे पारितोषिक रोख रुपये पंचवीस हजार व सन्मान चिन्ह जय भवानी मित्र मंडळ यांच्या ‘तृतीय पंथ किन्नर समाजाचा आक्रोश’ या थीम साठी मिळाले. आणि तिसरे पारितोषिक रोख रुपये अकरा हजार व सन्मान चिन्ह एकविरा मित्र मंडळ यांच्या ‘आनंद असावा सुमनापरी’ या थीम साठी मिळाले. या शिवाय इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. तसेच शहरअध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार,मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण,मुकेश मोकाशी, सुनील हंडोरे, विलास साठे,विकास पाटील, सुरज दळवी, माजी नगरसेविका नम्रता कोळी,स्नेहा आंब्रे यांनी हजेरी लावली. याशिवाय ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ फेम बाल गायक मोहित घोरपडे व शौर्य घोरपडे (भिवंडी) यांचा मानधन देऊन गौरव करण्यात आला आणि देशाच्या चांद्रयान मोहिमेत आपले तांत्रिक सहाय्य देणाऱ्या एच. डी. फायर प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मिहीर घोटीकर (वागळे इस्टेट) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर  गायिका सानिका कुलकर्णी,  अभिनेत्री सोनाली पाटील, पूजा पुरंदरे, काजल काटे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. याप्रकारे शालेय मुलांची कागदापासून मूर्ती बनवण्याची स्पर्धा, गृहिणीसाठी मोदक स्पर्धा अशा विविधरंगी, बहुढंगी उपक्रमाने हा यंदाचा गणेश दर्शन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याने आयोजक डॉ.राजेश मढवी,प्रतिभा मढवी तसेच लोकमत समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, नितीन खरे यांनी सर्वांचे आभार मानले.

 25,925 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.