दहावी शिकलेल्या राजकीय ‘पीआरओ’मुळे उपजिल्हा रूग्णालयाची गोपनियता धोक्यात


पनवेल संघर्ष समितीने उघडकीस आणला कारभार


पनवेल : खासगी व्यक्तीकडून गोपनियतेचा भंग होत असल्याने पनवेल उपजिल्हा रूग्णालयाकडे एचआयव्ही, क्षयरोग (टीबी) आणि इतर रूग्णांनी सपशेल पाठ फिरवली आहे. उपजिल्हा रूग्णालयात स्थानिक आमदारांनी तेथील खडानखडा माहिती मिळावी, म्हणून नियमबाह्यरित्या दहावी शिकलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला रूग्णांवर पाळत ठेवण्यासाठी नेमले आहे. ही चिड आणणारी आणि धक्कादायक घटना पनवेल संघर्ष समितीने चव्हाट्यावर आणून सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वी घाईघाईने आ. प्रशांत ठाकूर यांनी पनवेल उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्याचा घाट घाटल्याने ते रूग्णालय अद्यापही ‘व्हॅटिलेंटर’वर आहे. त्यातच डॉक्टरांची असलेली वानवा पनवेल संघर्ष समितीने रेटा लावून संपुष्टात आणली असताना, उपजिल्हा रूग्णालयात एका राजकीय कार्यकर्त्याचा दिवसभर असलेला वावर पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्याकडे चौकशी केली असता, अविनाश कांबळे नावाच्या दहावी इयत्ता शिकलेल्या कार्यकर्त्याला स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर पगार देत असून त्याला इथे काम करण्यास ठेवले आहे. अशी नियुक्ती बेकायदेशिर आहे, याची साक्ष देत दहावी शिकलेला कामगार चक्क पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचा जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) असल्याची कबुली डॉ. येमपल्ले यांनी देवून पनवेलकरांना धक्का दिला आहे. उपजिल्हा रूग्णालयातील प्रत्येक घटनेवर पाळत ठेवून त्याची इत्यंभूत माहिती ठाकूर यांना पुरविणार्‍या अविनाश कांबळे यांना तेथील डॉक्टरही ‘पीआरओ’ म्हणूनच हाक मारतात.

आमदारांचा बालहट्ट
आ. ठाकूर यांच्या बालहट्टामुळे मात्र, रूग्णालयाची गोपनियता धोक्यात आल्याने १२० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाकडे एड्स आणि क्षयरोगबाधित रूग्ण तिकडे फिरकण्यास तयार नाहीत. ते खासगी रूग्णालयात उपचार घेत असून आपल्या आजाराची माहिती उपजिल्हा रूग्णालयातून उघड झाल्यास समाज आपल्याकडे संकुचितवृत्तीने पाहिल, असा न्युनगंड त्यांच्यात निर्माण झाल्याने त्यांनी उपचारासाठी इकडे पाठ फिरवली आहे.
याशिवाय गावागावात होणारे राजकीय हल्ले, मारामारी झाल्यानंतर पोलिसांनी उपचारांसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांचे जखमी अवस्थेतील फोटोही उपजिल्हा रूग्णालयातून तात्काळ ‘व्हायलर’ होत असल्याने पोलिस तपासातही अडचणी निर्माण होत आहेत.
एकंदर सार्वजनिक आरोग्य खात्याची बदनामी आणि गोपनियतेचा भंग करणारी ही धक्कादायक बाब समोर आणून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याच्या आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालिका डॉ. साधना तायडे व उपसंचालिका डॉ. गौरी राठोड यांच्याकडे लेखी तक्रार, एसएमएस, व्हॉट्सअप मेसेजद्वारे गंभीर तक्रार दाखल केली आहे
आमदारांनी नाहक झापले
नियमबाह्य पीआरओबाबत पनवेल संघर्ष समितीच्या तक्रारीनंतर अविनाश कांबळे यांना उपजिल्हा रूग्णालयात येण्यास मज्जाव केल्याने आ. प्रशांत ठाकूर यांनी मला नाहक झापले. त्याशिवाय काय करायचे ते करा, अविनाशला इथे काम करण्यास कोण बंदी घालतो ते पाहतो, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. या राजकारणाचा मला कंटाळा आला असून प्रचंड़ मानसिक त्रास होत असल्याचे पनवेल उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले म्हणाले.

 447 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.