डॉ. य. बा. दळवी यांचे विचार म्हणजे मिळकत

पद्मश्री पुरकाराने गौरवण्याची मागणी


कळसुली : ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. य. बा. दळवी यांना दैवी पाठबळ लाभले आहे. अशा तपस्वी आणि पूजनीय माणसांविषयी आदर आणि अभिमान वाटतो. त्यांचे विचार म्हणजे मिळकत मानतो व ती जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार अरूण दाभोळकर यांनी कळसुली मुक्कामी काढले. ते डॉक्टरांच्या ९५ व्या वाढदिवशी आयोजित गौरव सोहळ्यामध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की , त्यांच्या बाजूला बसलो असता ऊर्जेची कंपने जाणवत होती. मला चक्क देवात्याचा साक्षात्कार झाला. ‘आमचे डॉक्टर’ संबोधल्या जाणाऱ्या य.बा. दळवींच्या गौरव सोहळ्याला शिक्षणक्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व  एस.एस. उपाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
या गौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांमध्ये वैद्यकिय क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे डॉ. चंद्रकांत राणे, प्रा. महेंद्र नाटेकर, प्रा. जी.ए. सावंत, चार्टर्ड अकाऊंटंट सुहास पालव, कळसुली हायस्कूलचे चेअरमन सूर्यकांत दळवी, अशोक करंबेळकर, नाट्यकर्मी आणि प्रकाशक वामन पंडित ही मंडळी आवर्जून उपस्थित होती.
प्रा. नाटेकर हे १९७३साली कळसुली हायस्कूलचा 1१०० टक्के निकाल लावणारे पहिले मुख्याध्यापक. त्यांनी डॉक्टरांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या स्थायीभावावर प्रकाश टाकला. खरे तर आम्ही त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हाच त्यांचा यथोचित गौरव ठरावा, असे प्रखर प्रतिपादन केले. त्यांचे चारित्र्य, चरित्र आणि कार्य हे सर्वांसाठी आदर्श असेच आहे. हा देवमाणूस आहे. खरा पण सरकार दरबारी यांच्या कार्याची का दखल घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित करून त्यांना पद्मश्री दिली जावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. योग्यता असलेल्या व्यक्तिला असे पुरस्कार देणे सरकारचे कर्तव्य नाही का, असा खडा सवाल त्यांनी केला.
डॉ.य.बा.दळवी  गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष जे.जे दळवी आपल्या प्रास्तविकामध्ये म्हणाले, त्यांनी श्रीमंतीपेक्षा जनसेवेला प्राधान्य दिले. कळसुली दशक्रोशी त्यांचे कार्य विसरू शकणार नाही. येथल्या भागाचा खरा विकास त्यांच्यामुळेच घडला. कळसुली हायस्कूलचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांनी म्हटले, त्यांनी समाजकारण करताना अर्थकारणाकडे केव्हाच लक्ष दिले नाही. डॉ. दळवी यांना प्रा. उपाध्ये यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. थोर समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांनी हेरलेले हे रत्न पुढे प्रा. मधु दंडवते यांचा खंबीर साथी म्हणून नावारूपाला आले. कोकणात समाजवादी चळवळीला बळ देण्यात ते आघाडीवर होते, असा उल्लेख या सन्मानपत्रामध्ये आहे.

 हे हात सेवेसाठी आहेत
सत्काराला उत्तर देताना डॉ. य.बा. दळवी भावूक होत म्हणाले, हे हात सेवेसाठी आहेत. ते जरी आता थकले असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहावी, असे वाटते. मला दोन वेळा आमदारकी मिळाली, पण त्यात मी रमलो नाही. मंत्री खोटी उत्तरे देतात. त्याची मला चीड यायची. ते ऐकेनासे वाटू लागले. आमच्या कोकणातले  कार्यकर्ते नेक होते, रद्दीवर झोपत आणि उपाशी पोटी काम करत. त्यांच्यासाठी समाजासाठी मी काही करू शकणार नाही, अशी माझी पक्की खात्री झाली व त्यापेक्षा आपली वैद्यकिय सेवा करण्याला महत्त्व दिले.राजकारणामध्ये  स्वच्छ चारित्र्याचे प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे. तसे झाले तरच देशाचे भले होईल, असा टोला त्यांनी लगावताना आमच्या राजकीय-सामाजिक स्थितीवर कोरडे ओढले. आपण काही रूग्णावर उपचार करून मृत्युच्या दाढेतून बाहेर काढू शकलो ते केवळ दैवी पाठबळामुळेच हे त्यांनी स्पष्ट केले, त्यविषयक एक-दोन कहाण्या सर्वांनाच भावुक करून गेल्या.

 729 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.