डींग डाँगचा थरारक विजय

सुप्रिमो चषक : शेवटच्या चेंडूवर एनबी अवधचा पाच धावांनी पराभव

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणार्‍या सामन्यात डींग डाँग नियाजी वॉरिअर्सने एनबी अवध संघाचा पाच धावांनी पराभव करीत सुप्रिमो चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याआधी डींग डाँगने गुजरातच्या रॉयल एकता संघाचा तर पुण्याच्या एनबी अवधने मुंबईच्या विक्रोलियन्स संघाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
एकीकडे आयपीएलच्या थरार सुरू असतानाही टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेलाही प्रेक्षकांचा लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद आयोजक आमदार-विभागप्रमुख संजय पोतनीस आणि
आमदार विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांच्या कल्पकतेला-मेहनतीला मिळालेली पावती आहे. घड्याळाचे काटे एकच्या पुढे गेले तरी प्रेक्षकांनी सुप्रिमोची जागा सोडली नाही. क्रिकेटवेड्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत बांधून ठेवणार्‍या या सामन्यात डींग डाँगला एनबी अवधच्या फरमान खान, धीरज सिंग, झैद खान आणि विजय गायकवाड यांच्या अचूक मार्‍यापुढे फार मोठी मजल मारता आली नाही. सुप्रिमो चषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर करणार्‍या कृष्णा सातपुतेला अवघ्या चारच धावा करता आल्या. डींग डाँगचा एकही फलंदाज फटकेबाजी करू शकला नाही. केवळ दोन चौकार बसलेल्या या डावात डींग डाँग ८ बाद ४९ धावा करू शकला. एनबी अवधला विजयासाठी ५० धावांचे लक्ष्य गाठायचे होते.पण डींग डाँगच्या राजेश सोरटे, विजय पवळे, अंकित गोइनाने टिच्चून मारा करीत एनबी अवधच्या फलंदाजांना अक्षरशा बांधून ठेवले. त्यामुळे त्यांचा संघ ७ षटकांत ५ बाद ३२ अशी मजल मारू शकला होता. त्यांना शेवटच्या षटकांत १८ धावा करायच्या होत्या, पहिल्या ४ चेंडूंवर लोकेश चौहान- अक्षय टावरेला सहा धावा मिळाल्या. त्यामुळे शेवटच्या २ चेंडूंवर दोन षटकारांची गरज होती. तेव्हा लोकेश चौहानने अंकित कलकीचा चेंडू थेट सीमारेषेपलकिडे मारला. या षटकाराने सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचवली. लोकेशने पुढच्या चेंडूही जोरात भिरकावला, पण तो षटकार होऊ शकला नाही आणि डींग डाँगने सामना पाच धावांनी जिंकला. लोकेशने २ षटकारांसह नाबाद २० धावा केल्या. केवळ ८ धावा देत २ विकेट घेणारा राजेश सोरटे सामनावीर ठरला.
एजाज कुरेशीच्या तडाखेबंद ६७ धावा
आज सुप्रिमो चषकात एजाझ कुरेशी नावाचे वादळ घोंघावले. त्याने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर अफझल सिंधीला चौकार ठोकत आपल्या धावांचे खाते उघडले. त्यानंतर त्याने सलग तीन चौकार खेचत चौकारांचा चौकारही लगावला. त्याने २३ व्या चेंडूवर आपले अर्धशतक साजरे केले. हे या मोसमातील पहिले अर्धशतक ठरले. एजाझने आपल्या ३० चेंडूंच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. या खेळीमुळे डींग डाँगने ८ बाद ९९ धावा केल्या. गुजरातच्या रॉयल एकताला डींग डाँगचे १०० धावांचे आव्हान पेलवलेच नाही. अंकित कलकी आणि भूषण गोळेच्या अचूक मार्‍यासमोर रॉयल एकता ५७ धावाच करू शकला आणि डींग डाँगने ४२ धावांनी विजय नोंदविला.
एनबी अवधचा सहज विजय
धीरज सिंग, फरमान खान आणि विजय गढवाली यांच्या मार्‍यापुढे मुंबईच्या विक्रोलियन्सचा संघ ८ षटकांत ६५ धावांवर आटोपला. धीरज सिंगने १७ धावांत ३ विकेट टिपले. त्यानंतर विक्रोलियन्सचे ६६ धावांचे आव्हान एन बी अवधने ६.३ षटकांतच गाठले. कृष्णा गवळीने १९ चेंडूंत २९ तर आकाश चिंदरियाने ९ चेंडूंत १८ धावा ठोकत ४१ धावांची अभेद्य भागी रचली. ३ विकेट घेणारा धीरज सामनावीर ठरला.
कृष्णा सातपुतेच्या ३०० धावा
डींग डाँगच्या कृष्णा सातपुतेने दुसर्‍या दिवशी झालेल्या दोन्ही सामन्यात १९ धावा करत सुप्रिमो चषकात सर्वाधिक धावांचा विक्रम स्वताच्या नावावर नोंदविला. काल मुन्ना शेखने त्याला गाठले होते, पण आज तो पुन्हा त्याच्या पुढे गेला. तसेच तो ३०० धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. या कामगिरीनिमित्त आयोजक आमदार संजय पोतनीस, आमदार अ‍ॅड. अनिल परब आणि विभागप्रमुख महेश सावंत यांनी त्याचा विशेष सत्कार केला.

 117 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.