शिरसाट स्पोर्ट्सचा सुसाट विजय

दमदार विजयांसह उपांत्य फेरीत धडक

मुंबई : शिरसाट स्पोर्ट्सच्या भन्नाट खेळापुढे ना ताई पॅकर्स चे काही चालले ना सेंट एंजेलोज संघाला त्यांच्यासमोर आव्हान उभे करता आले. शिरसाठ स्पोर्ट्स ने दमदार खेळाचे प्रदर्शन करीत सुप्रीम चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारले. आता टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेला सुप्रिमो चषक स्पर्धेचा करंडक जिंकण्यासाठी उमर इलेव्हन, डिंग डॉंग, शौर्य हर्षित आणि शिरसाट स्पोर्ट्स या संघात उपांत्य फेरीची लढत रंगेल. उपांत्य लढतीत कोणते संघ एकमेकांशी घडतील याचा फैसला ड्रॉ पद्धतीने केला जाणार आहे.
एकीकडे आयपीएल सुरू असताना आमदार – विभागप्रमुख संजय पोतनीस आणि आमदार – विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या भन्नाट संकल्पनेतून सुरू असलेल्या सुप्रिमो चषकाच्या सांताक्रुझच्या एअर इंडिया स्पोर्ट्स स्टेडियमला अक्षरश: टेनिस क्रिकेटच्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हिंदुस्थानातून आलेल्या एकापेक्षा एक बलाढ्य टेनिस क्रिकेट संघाचा खेळ पाहण्यासाठी टेनिस क्रिकेटवेडे वारकऱ्यांप्रमाणे तहानभूक विसरून मध्यरात्री २-२ वाजेपर्यंत सुप्रिमो चषकाचा आनंद लुटत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनापासून उसळत असलेला क्रिकेटप्रेमींचा जनसागर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
आज सुप्रीमो चषकात टेनिस क्रिकेटची अनिश्चितता भरभरून दिसली. शिरसाट स्पोर्ट्सने दोन्ही सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ग्लोबल सेंट एंजेलोजने नाणेफेक जिंकून शिरसाट स्पोर्ट्सला फलंदाजीचे आमंत्रण दिले. धोनी लेफ्टी (२४) आणि पुटू(१८) यांनी केलेल्या जोरदार खेळांमुळे शिरसाट स्पोर्ट्स ८ षटकात ६४ धावा करू शकला. शेवटच्या दोन षटकात २४ धावा चोपून काढल्यामुळे ते ६४ धावांपर्यंत पोहोचू शकले होते. पण ग्लोबल सेंट एंजेलोजला हे आव्हानही खूप मोठे वाटले. सिब्बन शेखने पहिल्या षटकातच तीन फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवीत ग्लोबल सेंट एंजेलोजचा पराभव निश्चित केला. सिब्बनने अवघ्या ७ धावांत प्रतिस्पर्ध्यांच्या अर्धा संघ बाद करण्याची किमया दाखवली. त्याला पप्पी लुबानाने सुरेख साथ दिल्यामुळे सेंट एंजेलोज ८ षटकात ९ बाद ३५ अशी निराशाजनक धावसंख्या गाठू शकला. शिरसाट स्पोर्ट्सने २९ धावांच्या विजयासह उपांत्य फेरीत मजल मारली.
फुसका धमाका
दिल्लीहून आलेला धमाका क्लब ग्लोबल सेंट एंजेलोज संघासमोर अक्षरश: फुसका बार ठरला. ग्लोबल सेंट एंजेलोजच्या सनी कसबेने आपल्या पहिल्याच चेंडूवर रणजीत यादवला पायचीत करून संघाला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर जगत सरकार आणि सरोज प्रामाणिकने जबरदस्त खेळ करीत ५५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे धमाका क्लब आव्हानात्मक धावसंख्या उभारेल असे वाटत होते पण सुधीर साबळेने एका षटकात सरकार आणि प्रामाणिक यांना बाद करीत धमाका केला. त्यामुळे धमाका क्लब ६ बाद ६४ अशी धावसंख्या करू शकला आणि ग्लोबल सेंट एंजेलोजने ६४ धावांचे आव्हान दत्ता पवारच्या २१ चेंडूतील ३७ धावांच्या झंझावाती खेळीमुळे अवघी एक विकेट गमावत ६.३ षटकातच गाठले. दत्ता पवारच या विजयाचा शिल्पकार ठरला.
दुसऱ्या सामन्यात ताई पॅकर्सने करण मोरेच्या २८ धावांच्या फटकेबाजीमुळे ५ बाद ६७ अशी दमदार मजल मारली होती. ताई पॅकर्सच्या ५ विकेटपैकी चार विकेट धावबादच झाले होते. रवी अहिरेने ७ चेंडूत १७ धावा फटकावताना शिरसाट स्पोर्ट्सला २० धावांची सलामी दिली होती. तेव्हा प्रीतम मोरेने सलग दोन विकेट घेत त्यांच्या डावाला सुरुंग लावला. मग पुढच्या षटकात आणखी दोन विकेट घेत शिरसाट स्पोर्ट्सची ५ बाद २८ अशी दुर्दशाही केली. यादरम्यान प्रीतम मोरेने ४ विकेट टिपले. मात्र त्यानंतर संस्कारने १२चेंडूत २६ धावा चोपत धनंजय बिनताडेबरोबर ३३ धावांची भागी रचली आणि संघाला ९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
सुप्रिमो विक्रम
शिरसाट स्पोर्ट्स च्या सिब्बन शेख या गोलंदाजाने पुण्याच्या ग्लोबल सेंट अंजेलोस या संघाविरुद्ध दोन षटकात अवघ्या सात धावा देत पाच गडी बाद केले. सुप्रिमो चषकाच्या इतिहासात एका डावात पाच विकेट बाद करणारा तो सहावा गोलंदाज ठरला.
ताई पॅकर्स (पालघर) या संघाच्या प्रीतम बारी या गोलंदाजाने शिरसाट स्पोर्ट्स या संघाविरुद्ध २ षटकात ८ धावा देत ४ विकेट बाद केले. याआधी अशी कामगिरी केवळ नाझीम गुल्लीने केली होती.
ग्लोबल सेंट अँजेलोस संघाच्या 8 केवळ ९ बाद ३५ धावा. २०१२ साली अंधेरीच्या एनवायसीसीविरुद्ध वांद्र्याच्या ऋषिता इलेव्हनचा संघ ६ षटकात ८ बाद २१ धावा करू शकला. हा आजवरचा निच्चांक आहे.

 259 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.